पुणे || हातोडा पॅटर्न’साठी ओळखले जाणारे पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. पुणे अतिक्रमण विभागाने दिव्यांग व्यक्तीच्या टेम्पोला लावलेले जॅमर मोरेंनी हातोड्याने तोडले. खुद्द मोरेंनीच या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
संबंधित दिव्यांग व्यक्ती टेम्पोच्या माध्यामातून आंबे आणि कलिंगड विकण्याचा व्यवसाय करत होता. मात्र अनधिकृत पद्धतीने गाडी लावत व्यवसाय करत असल्याचा ठपका ठेवत पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने छोटा हाथी टेम्पोला जॅमर बसवले. दिव्यांगाकडून याविषयची माहिती पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांना समजली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पोला लावलेल्या जॅमरवर हातोडा मारला.

कोरोनामुळे निधन झालेल्या नातेवाईकाचे पार्थिव नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने गेल्या वर्षी वसंत मोरे यांनीच पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली होती. तेच वसंत मोरे उर्फ ‘तात्या’ भेटायला येणार आहेत, असं समजताच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या निवृत्त शिक्षकाचं बिलही माफ झालं होतं. खुद्द वसंत मोरेंनीच सोशल मीडियावरुन हा किस्सा सांगितला होता.