इंदापूर : आय मिरर
भिगवण, बारामती, परांडा आणि यवत भागात चोरी, मारहाण असे विविध गुन्हे दाखल असलेल्या दोघा अट्टल गुन्हेगारांना भिगवण पोलिसांनी मोठ्या शिताफिने जेरबंद केले आहे.चैतन्य पांडुरंग शेळके आणि किशोर सहदेव पवार दोघे रा. भोत्रा, ता. परांडा, जि.उस्मानाबाद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.अटक करण्यात आलेल्या आरोपींनी भिगवण, बारामती, परांडा आणि यवत पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या ७ गुन्ह्यांची कबुली दिली असल्याची माहिती भिगवण पोलिसांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
शनिवारी दि.१७ सप्टेंबर रोजी रात्रगस्ती दरम्यान भिगवण पोलिसांना संशयितरित्या फिरताना दोघे निदर्शनास आले.भिगवण पोलीसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून धारदार शस्त्रास्त्रे आढळून आली.पोलिसांनी त्यांना धारदार शस्त्रांसह अटक केली असून या दोघांकडून चोरीची दुचाकी, मोबाईल आणि रोख रक्कम देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
या अट्टल चोरट्यांनी माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वारजे येथून त्यांच्याकडील ज्युपिटर दुचाकी,शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ट्रॅक्टर चालकाला मारहाण करून त्याच्या जवळील ४५ हजार १३० रुपये व ट्रॅक्टर , तसेच परांडा येथून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.या तरुणांवर भिगवण, बारामती, परांडा आणि यवत भागात चोरी, मारहाण आणि शिवीगाळ केल्याचे वेगवेगळे ७ गुन्हे दाखल असून, त्यांनी या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डाॅ.अभिनव देखमुख,अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवणचे सहा.पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, विनायक दडस पाटील, पोलीस अंमलदार समीर करे, सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, अजित सरडे, होमगार्ड आप्पा सातपुते, लक्ष्मण ढवळे, पोलीस मित्र रवी काळे, सिधु आळंदकर, अशोक सुळके यांनी केली.