भुजबळ राष्ट्रपती झाले तरी आरक्षण ओबीसीतूनच घेणार, मनोज जरांगेंनी स्पष्टचं सांगितलं

Feb 6, 2024 - 16:55
 0  396
भुजबळ राष्ट्रपती झाले तरी आरक्षण ओबीसीतूनच घेणार, मनोज जरांगेंनी स्पष्टचं सांगितलं

आय मिरर

छगन भुजबळांच्या राजीनाम्याचा विषय छेडत जरांगे-पाटलांनी टोला लगावलाय. भुजबळांनी राजीनामा दिलाच नसेल, ते राष्ट्रपती झाले तरी आरक्षण ओबीसीतूनच आरक्षण मिळवून दाखवणार असं आव्हानच जरांगेंनी दिलंय. इतकंच नाही तर भुजबळांनी आता तलाठी बनावं असा सल्लाही जरांगेंनी दिलाय त्याला भुजबळांनी प्रत्यत्तर दिलंय. जरांगेंनी आधी ग्रामपंचायत निवडणूक लढवून दाखवावी असा सल्ला छगन भुजबळांनी दिलाय. 

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई, पुणे, नाशिकचा दौऱ्याला आजपासून सुरूवात झालीये. मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून आळंदीकडे निघालेत. तर उद्या नवी मुंबईतल्या कामोठेत सकाळी तर, संध्याकाळी मुंबईत दादरमधल्या शिवाजी मंदिरातल्या कार्यक्रमाला ते जातील.8 फेब्रुवारीला सटाणा आणि 9 फेब्रुवारीला बीडमध्ये त्यांचा दौरा आहे. सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जरांगे यांनी 9 फेब्रुवारीची डेडलाईन दिलीय. नाहीतर 10 फेब्रुवारीपासून जरांगे पुन्हा आमरण उपोषण करणार आहेत.

मनोज जरांगे यांचा इशारा

राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर (GR) मराठा आरक्षणाबाबतचं आंदोलन जरांगेंनी मागे घेतलं होतं. मात्र सोशल मीडियावरुन जरांगेंविरोधात जोरदार टीका झाली. जरांगेंची फसवणूक झाल्याची ही टीका होती. त्यावरुन आता जरांगे चांगलेच संतापले आहेत. आरक्षण मिळालं तरीही गैरसमज पसरवण्याचे काम होत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. हा कट रचणाऱ्यांची नावं उघड करण्याचा इशारा आता जरांगेंनी दिलाय. तसंच सोशल मीडियावर लिहिण्यापेक्षा अंतरवाली सराटीत येऊन कायद्यात बदल सूचवा असं आवाहनही त्यांनी केलंय. तसंच सोशल मीडियावर ट्रॅप रचणाऱ्यांची नाव लवकरच उघड करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

याचिकेत सुधारणा करण्याचे आदेश

कुणबी प्रमाणपत्र अधिसूचनेविरोधात ओबीसी वेल्फेअर असोशिएअननं दाखल केलेल्या याचिकेत सुधारणा करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. ओबीसी वेलफेअर असोशिएअनच्या याचिकेत महाधिवक्त्यांना प्रतिवादी करण्यात आलं होतं, यावरुन कोर्टानं फटकारलंय. तुम्ही महाधिवक्त्यांना प्रतिवादी कसे करु शकता असं म्हणत कोर्टानं याचिकेत सुधारणा करण्याचे आदेश दिले.. 

ओबीसींच्या नव्या पक्षाची घोषणा

ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी ओबीसींच्या पक्षाची घोषणा केलीय. अधिकार असतानाही सत्तेचा वाटा आमच्यापर्यंत येऊ दिला नाही, त्यामुळे पक्ष स्थापन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता असं शेंडगेंनी म्हटलंय. ओबीसी पक्षाचं नाव, त्याची कार्यकारिणी, संघटन, विस्तार याबद्दल लवकरच घोषणा करण्यात येणार आहे..

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow