धैर्यशील मोहिते पाटलांची भाजपला सोडचिठ्ठी ! फडणवीसांचं टेंन्शन वाढलं,माढ्यात निंबाळकर विरूध्द मोहिते?

Apr 12, 2024 - 15:15
Apr 12, 2024 - 15:28
 0  476
धैर्यशील मोहिते पाटलांची भाजपला सोडचिठ्ठी ! फडणवीसांचं टेंन्शन वाढलं,माढ्यात निंबाळकर विरूध्द मोहिते?

आय मिरर

भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत जाणार आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत इनकमिंग सुरू असताना भाजपला मोठा धक्का बसला आहे.त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसणार असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं बळ मिळणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार, अशा चर्चा आहेत.   

धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे चुलते जयसिंह मोहिते पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. आम्हाला कोणत्याही ईडीची भीती नाही, असं जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर जयसिंह मोहिते पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. आम्हाला कोणत्याही ईडीची भीती नाही. आमच्या सर्व संस्था व्यवस्थित सुरू आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याशी संपर्क साधला असता तर ही वेळ आली नसती, असं जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.

गुलाल आघाडीचाच

सुमित्रा पतसंस्थेचे एक हजार कोटी रुपये गेल्या दहा वर्षात परत केले आहेत. आमच्या सर्व संस्था सुरळीत सुरू आहेत. त्यामुळे आम्हाला कुठल्या ईडीची कुठल्या पक्षाची भीती नाही. आता माढा लोकसभेच्या गुलालासोबत सोलापूर आणि बारामतीचा गुलालही महाविकास आघाडीचाच असणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

आंबेडकर जयंतीला प्रवेश

रणजितसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीत येऊ नका असे आम्ही सांगितले आहे. भाजपने त्यांना खूप मदत केली आहे. 14 एप्रिलला फक्त धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. 16 एप्रिल रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरून अकलूज येथे प्रचार सभा घेणार आहेत. कारखान्याला केलेली मदत ही देणगी नसून कर्ज आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील यांच्या या निर्णयावर भाजपचे माढा लोकसभेचे सहप्रभारी संतोष पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मोहिते पाटलांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेणं त्यांच्यासाठी मारक आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शरद पवार गटात जाण्याला भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा विरोध. मोहिते पाटील महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवल्यास त्यांना गृहकलहाचा सामना करावा लागू शकतो, अशी प्रतिक्रिया माढा लोकसभेचे सहप्रभारी संतोष पाटील यांनी व्यक्त केली आहे.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आम्ही त्यांचा मान, सन्मान ठेवण्याचा कायम प्रयत्न केला. त्यात आम्ही कोठेही कमी पडलो नाही. मात्र, पंतप्रधान मोदींच्या निवडणुकीत त्यांनी अशाप्रकारे राजीनामा देणं योग्य नव्हतं. कारण जनता मोदींच्या पाठीशी आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील देखील विधान परिषदेच्या आमदारकीच्या राजीनामा देण्याच्या तयारीत आहे, अशी चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले, याबाबतीत रणजितसिंह मोहिते पाटील मला काही बोलले नाहीत. रणजितसिंह यांची भूमिका महायुतीसोबत राहण्याची आहे. ते आमच्या सोबत राहतील.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow