इंदापूरात विधानसभेसह सर्वच निवडणुकीत कमळ फुलणारचं - राजवर्धन पाटील

Feb 6, 2024 - 13:05
Feb 6, 2024 - 15:48
 0  330
इंदापूरात विधानसभेसह सर्वच निवडणुकीत कमळ फुलणारचं - राजवर्धन पाटील

आय मिरर(देवा राखुंडे)

राज्यात सध्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले असून लोकसभेच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असतानाच विधानसभेची देखील जोरदार तयारी सुरू झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात कमळ फुलवण्यासाठी आणि इंदापूर विधानसभेत देखील कमळ फुलण्यासाठी इंदापूर भाजपाने कंबर कसली असून तालुक्यातील आगामी सर्वच निवडणुका या माजी मंत्री भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकतिनीशी लढू व जिंकू, असा निर्धार इंदापूर तालुका भाजपा युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केलाय.       

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एन.सी.डी.सी.) जनरल कौन्सिलवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची निवड केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजवर्धन पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

पाटील म्हणाले की,भारतीय जनता पार्टीचे केंद्र व राज्य पातळीवरील नेतृत्व हे भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे आगामी काळात इंदापूर तालुक्यामध्ये होणाऱ्या सर्व निवडणुका भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली आम्ही ताकतिनीशी लढू आणि त्या जिंकू देखील. 

आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबरोबर लोकसभा, विधानसभा निवडणुका होणार आहेत. या सर्व निवडणुकांसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.

आपला तालुका हा आपल्या विचारांचा आहे. गुण्यागोविंदाने नांदनारा आहे. एकमेकांच्या सुखदुःखात एकत्र येणारा आहे. हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी आपल्याला हर्षवर्धन पाटील यांच्या पाठिंबा उभे राहावे लागणार आहे. इंदापूर तालुक्यातील भाजपसाठी आगामी राजकीय भविष्यकाळ हा निश्चितपणे उज्वल राहणार असल्याने, आगामी सर्व निवडणुकांसाठी भाजप कार्यकर्त्यांनी जिंकू या निर्धाराने आजपासून काम सुरु करावे, असे आवाहन राजवर्धन पाटील यांनी याप्रसंगी केले.    

तालुक्यातील जनतेच्या हिताचे निर्णय राज्य सरकार तसेच केंद्र सरकार घेत आहे. दूध दर असेल, कामगारांचे प्रश्न देखील मार्गी लागले आहेत. राम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. यामुळे लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.भाजपा हा दूरदृष्टीने निर्णय घेणारा व नियोजन करणारा तळागाळापर्यंत पक्ष संघटना पोहोचलेला देशातील व राज्यातील एकमेव पक्ष आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात उत्तम काम करीत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींचे खंबीर पाठबळ आपल्या पाठीशी असल्याने आगामी सर्व निवडणुका जिंकण्यासाठी आपणास कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्यात आगामी सर्व निवडणुका संपूर्ण ताकदीने लढवून भाजपची ताकद वाढवू या, असे आवाहनही यावेळी इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे अध्यक्ष राजवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow