त्यांचं केवढं मोठं धाडस त्यांनी इंदापूर तालुक्यातून तब्बल आठ लाखाच्या शेळ्या चोरल्या,पण एलसीबीने करेक्ट कार्यक्रम केला

आय मिरर
इंदापुर तालुक्यातील साडे आठ लाख रूपये किंमतीच्या 83 शेळया चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत.या टोळीकडून वालचंदनगर, इंदापुर व यवत पोलीस स्टेशन च्या हद्दीतील एकूण तब्बल 11 गुन्हे उघकीस आले आहेत. रोहित दत्तात्रय कटाळे व साहिल विलास चौधरी अशी अटक केलेल्यांची नावे असून हे दोघेही पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन येथील आहेत.तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.तर पोलिसांनी गुन्हा करताना वापरलेला मारुती सुझुकी सुपर कॅरी ही जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,इंदापुर व वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेले काही दिवसांपासुन शेळ्या चोरीचे प्रमाण वाघाळे होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामधील स.पो.नि.कुलदीप संकपाळ, स.पो.फौ. बाळासाहेब कारंडे, पो.हवा अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, निलेश शिंदे हे इंदापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते.
याचवेळी पो.हवा स्वप्नील अहिवळे यांना गोपनीय बातमीदार यांचेमार्फत बातमी मिळाली की, वालचंदनगर व इंदापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेळी व बोकड चोरी करणारी टोळी यांनी आंबळे रेल्वे स्टेशन येथुन कॉपर वायर चोरुन आणलेल्या आहेत व ते वरकुटे ता. इंदापुर गावाचे हद्दीत तलावाच्या जवळ बसले आहेत.
मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पाच इसम काही तरी जाळत बसल्याचे दिसले. त्यावेळी त्यांना पोलीसांची चाहुल लागताच ते सर्वजण पळुन जावु लागले. त्यापैकी रोहित दत्तात्रय कटाळे रा.तुपेवस्ती, उरळी कांचन यास पोलिसांनी पाठलाग करुन शिताफीने पकडले. त्यास विश्वसात घेवुन शेळी व बोकड चोरी बाबत विचारपुस केली असता त्यांने त्याचे साथीदार 1) साहिल विलास चौधरी रा. बोधेवस्ती, उरळी कांचन,2) वैभव ऊर्फ गोटया तरंगे रा.दत्तवाडी, उरळी कांचन,3) सचिन अरुण कांबळे, रा. तळवाडी चौक, उरळी कांचन 4)) खंडु महाजन रा. वडापुरी, ता. इंदापुर यांच्या मदतीने सर्वांनी मिळुन सचिन कांबळे याच्या मालकीचे मारुती सुझुकी सुपर कॅरी क्रमांक एम.एच 42 बी.एफ 6089 याचा वापर करुन वालचंदनगर, इंदापुर व यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शेळी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली.
सदर गुन्ह्यातील आरोपी वैभव तरंगे याचेवर पुणे शहर व पुणे ग्रामीण मध्ये चोरीचे 11 गुन्हे दाखल असुन लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्फत त्याचा तडीपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. आरोपी रोहित कटाळे याचेवर दौंड पोलीस स्टेशन येथे चोरीचा 01 गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी,डॉ. सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि.कुलदीप संकपाळ, स.पो.नि.दत्ताजी मोहिते,तसेच वालचंदनगर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. राजकुमार डुणगे, स.पो.फौ. बाळासाहेब कारंडे, पो.हवा.स्वप्नील अहिवळे, अभिजीत एकशिंगे, निलेश शिंदे,राजु मोमीन,अतुल ढेरे, योगेश नागरगोजे,अमोल शेंडगे यांनी पार पाडली.
What's Your Reaction?






