मराठा आरक्षणासाठी कांदलगांव मध्ये सोमवार पासून साखळी उपोषणाला सुरवात

Oct 10, 2023 - 18:31
 0  281
मराठा आरक्षणासाठी कांदलगांव मध्ये सोमवार पासून साखळी उपोषणाला सुरवात

आय मिरर

मनोज जरांगे-पाटील आणि योगेश केदार यांच्या मराठा आरक्षण मिळेपर्यंतच्या आंदोलनाच्या समर्थसाठी इंदापूर तालुक्यातील कांदलगाव मध्ये सोमवार दि.०९ ऑक्टोंबर पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.

संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मराठा वनवास यात्रेचे प्रमुख योगेश केदार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करुन एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालेचं पाहिजे,जय भवानी जय शिवाजी अशा विविध घोषणा देत हे साखळी उपोषण सुरु करण्यात आले. 

मराठा समाजाला ओबीसी मधून पन्नास टक्क्याच्या आतून आरक्षण मिळाले पाहिजे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाज संविधानिक मार्गाने आपला लढा सुरु ठेवील.मराठा समाजाची राज्यकर्ते जर पोती ओळखणार असतील तर २०२४ ला हा मराठा राज्यकर्त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जर १७ टक्के लिंगायत समाज बांधव कर्नाटकात सत्तांतर करु शकतात तर आम्ही ३२ टक्के मराठे आहोत हे केंद्रासह राज्य सरकारने लक्षात घ्यावे. जर मराठा समाजावर अन्याय कराल आणि आरक्षणाचा प्रश्न झुलवत ठेवाल तर महाराष्ट्रात पाहिलेले ४८ लोकसभा जिंकण्याचे दिवा स्वप्न राहिल असा गर्भित इशारा यावेळी योगेश केदार यांनी राज्य सरकारसह केंद्राला दिला आहे.

दरम्यान १४ ऑक्टोंबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची लाखोच्या संख्येत वादळी सभा पार पडणार असून या सभेस इंदापूर तालुक्यातीक तमाम मराठा समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन ही यावेळी योगेश केदार यांनी केले आहे.

यावेळी आंदोलक बंडु ननवरे यांनी प्रास्ताविक केले.तर गणेश बाबर,पवन घोगरे,प्रवीण पवार,महादेव सोमवंशी यांसह रामेश्वरी अमोल सरडे,शिवांस रणजित बाबर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.या साखळी उपोषणात मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow