सकल मराठा समाजाकडून पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण येथे रास्ता रोको

आय मिरर (विजयकुमार गायकवाड)
जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कृतीचे पडसाद आज दुसऱ्या दिवशी राज्यात उमटत असून इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको करत निषेध नोंदवण्यात आला.. आंदोलकांनी जवळपास 10 ते 15 मिनिटे पुणे सोलापूर महामार्ग अडवून धरला त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.यावेळी आंदोलकानी मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सदर आंदोलनामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ, ग्रामपंचायत भिगवन ग्रामपंचायत तक्रारवाडी, भोई समाज संघटना इंदापूर,अखिल भारतीय जैन संघटना पुणे जिल्हा,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट,अमर बौद्ध युवा संघटना भिगवण,अखिल भारतीय कुंची कोरवे समाज भिगवण,मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर,पिराचा दर्गा मज्जित ट्रस्ट भिगवण,भिगवण पत्रकार संघ इत्यादी संघटनांनी आपला पाठींबा दर्शवल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष अँड.पांडुरंग जगताप यांनी दिली.
या रास्ता रोकोच्या आंदोलनामध्ये भिगवण आणि भिगवण परिसरातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. मराठा महासंघाचा अपंग कार्यकर्त्याच्या हस्ते इंदापूरचे नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना आंदोलकांनी निवेदन दिले.
तर दुसरीकडे इंदापूरातील निमसाखर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काही काळ रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय. याचसोबत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पळसदेव गावात बंद पुकारत निषेध नोंदवण्यात आला आहे.झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
What's Your Reaction?






