मतभेद असले तरी चर्चेने सोडवू ! हर्षवर्धन पाटलांच्या लेटर बाँम्ब नंतर चंद्रकांत दादांचं स्पष्टीकरण
आय मिरर
देशात लोकसभा नावाचे लग्न असून, त्यासाठी सर्वजण मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले आहेत. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे याबद्दल सर्वांचे एकमत झाले असून, आमच्यात मतभेद असले, तरी ते आम्ही चर्चेने सोडवू,’ असे सांगून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘अबकी बार ४०० पार’चा नारा महायुतीच्या बैठकीत पुण्यात दिला.
भारतीय जनता पक्षाने पुणे, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघांचे ‘क्लस्टर’ केले असून, या मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांची मतदारसंघनिहाय बैठक पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित केली होती. भाजपच्या शहर कार्यालयात झालेल्या बैठकांनंतर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, प्रदीप गारटकर, शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे, संपर्कप्रमुख संजय मशालकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गटाचे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, संजय सोनावणे, बाळासाहेब जानराव आदी उपस्थित होते.
बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूरमध्ये महायुतीत तक्रारी आहेत. स्थानिक नेत्यांकडून एकमेकांविरोधात पोलिस संरक्षणाची मागणी केल्याचा प्रश्न पाटील यांना विचारला होता. यावर ते म्हणाले, ‘ज्या वेळी घरात मोठे लग्न असते, तेव्हा वेगवेगळ्या कारणाने विभक्त झालेले कुटुंब एकत्र येते. त्यानंतर जे पुन्हा वेगळे होतात किंवा आपण पुन्हा एकत्र येऊ या, असाही विचार होतो. देशात लोकसभा नावाचे लग्न असून, त्यासाठी सर्वजण मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले आहेत. कुटुंबातील एखादी गोष्ट खटकत असेल, तर ते सांगण्याचे स्वातंत्र्य आहे.’
What's Your Reaction?