मोठी बातमी ! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता 'या' वेळेत भरणार 4 थी पर्यंतचे वर्ग
आय मिरर
राज्यातील शाळा संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे सरकारने राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग आता सकाळी ९ किंवा ९ वाजेनंतर भरवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शासन परिपत्रकही जाहीर करण्यात आलं आहे.
राज्यपाल रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती. त्यानंतर मंत्रीकेसरकर यांच्या निर्देशानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण प्रेमी, पालक तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदविण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. गुगल लिंक वरील अभिप्राय व विविध शिक्षण तज्ज्ञ व शिक्षण प्रेमी व पालक यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे.
शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाही, याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी. ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी प्रकरण परत्वे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी/ शिक्षण निरीक्षक (प्राथमिक) यांनी मार्गदर्शन देऊन सोडविण्याची तजवीज करावी. यासाठी संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी/ शिक्षण निरीक्षक (प्राथमिक) यांच्याशी संपर्क साधून प्रकरण परत्वे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी, असेही या परिपत्रकानुसार स्पष्ट करण्यात आले आहे.
या अनुषंगाने केलेल्या अभ्यासामध्ये पुढील बाबी समोर आल्या आहेत. काही शाळा विशेषतः खासगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी सात नंतर असल्याचे दिसून येते. विविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे. पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने ते शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात आणि रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात. त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो.
ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो. मोसमी हवामान, विशेषतः हिवाळा व पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे, पावसामुळे व थंडी मुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होऊन ते बहुदा आजारी पडतात. सकाळी पाल्याला लवकर तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते. सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावरील धुके, पाऊस यामुळेही अडचणी निर्माण होतात.
What's Your Reaction?