शहाजीराजांचे समाधीस्थळ दुर्लक्षित असणे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद - ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील

Feb 20, 2025 - 15:32
 0  160
शहाजीराजांचे समाधीस्थळ दुर्लक्षित असणे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद - ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील

आय मिरर

स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजांचे समाधीस्थळावर साधे पत्र्याचे छत देखील नाही.अत्यंत वाईट अवस्था त्याठिकाणी आहे.आपल्या कर्तुत्वाने,शौर्याने निजामशाही व आदिलशाहीवर दहशत असणाऱ्या शहाजीराजांचे समाधीस्थळ दुर्लक्षित असणे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद असल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली.

इंदापूर शहर शिवजयंती उत्सव समिती आयोजित मालोजीराजे व्याख्यानमालेत " शिवरायांच्या जीवनातील अज्ञात व अपूर्वक रोमहर्षक घटना"या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंगलसिद्धी उद्योग समूहाचे प्रवर्तक राजेंद्र तांबिले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब मोरे,इंदापूर नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते गजानन गवळी उपस्थित होते. 

पुढे बोलताना विश्वास पाटील म्हणाले की भातवडीच्या युद्धात प्रथम शहाजीराजांनी गनिमी कावा वापरला. शहाजीराजांचे ६४ किल्ल्यांवर वर्चस्व होते.शहाजीराजांनी पेनगर नावाच्या किल्ल्यावर स्वतःचे राज्य स्थापन केले होते. शहाजीराजे हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक गुरु तसेच स्वराज्याचे संकल्प होते.शहाजीराजांनी आपल्या चारही पुत्रांना राजकीय,सांस्कृतिक तसेच युद्ध कौशल्याने निपुण केले.छत्रपती शिवाजी महाराजांना निसर्गाचा प्रचंड अभ्यास होता.प्रकाश, ध्वनी ,दिवस व रात्रीचा त्यांनी युद्धात पुरेपूर उपयोग केला.योग्य पद्धतीने मावळ्यांची निवड केली. सर्वाधिक खर्च गुप्तहेर खात्यावर केला. साधनसामग्री कमी असताना बलाढ्य शत्रुशी सामना करताना आपले कमीत कमी नुकसान झाले पाहिजे याची काळजी त्यांनी घेतली. 

शिवराय एक व्यक्ती नसून अनेक व्यक्ती त्यांच्या अंगी कार्य करत असत.छत्रपती शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्था, नियोजन हे जगाला प्रेरणादायी आहे.शिवरायांना फार कमी आयुष्य मिळाले,आणखी दहा वर्ष जरी त्यांना आयुष्य मिळाले असते तर भीमानदी कृष्णा काठची घोडी त्यांनी लंडनच्या थेन्स नदीकाठी नाचवली असती अशी माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली.

यावेळी राजेंद्र तांबिले यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत मालोजीराजे व्याख्यान समितीचे अध्यक्ष तथा इंदापूर नगर परिषदेचे गटनेते कैलास कदम व सुनील गलांडे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष नरूटे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शरद झोळ,योगेश गुंडेकर ,अनिकेत साठे,विशाल गलांडे, तुषार हराळे, अमोल खराडे,दत्तराज जामदार, संदिपान कडवळे, रमेश शिंदे,अमोल साठे,सचिन जगताप,ओम जगताप,आदित्य कदम यांनी प्रयत्न केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow