भरत शहा दाखवणार ताकद ? उद्याच्या दही हंडीकडे लागली सर्वांची नजर

Sep 14, 2023 - 16:56
Sep 14, 2023 - 18:43
 0  4938
भरत शहा दाखवणार ताकद ? उद्याच्या दही हंडीकडे लागली सर्वांची नजर

आय मिरर

गेल्या दिड वर्षापासून इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक लांबणीवर पडलीय. आता मात्र काही दिवसात या निवडणूका पार पडतील अशी चिन्ह आहेत. त्यामुळे इंदापूर शहरातील राजकारण तापू लागलयं. दहीहंडी सोहळ्याच्या माध्यामातून मातब्बर पक्षांसह स्थानिक नेते आणि कार्यकर्ते जोरदार शक्तीप्रदर्शन करताहेत. उद्या शुक्रवारी दि.१५ सप्टेंबर रोजी सायंकाळी जुन्या बाजार समितीच्या मैदानात भरतशेठ शहा मित्र परिवाराकडून भव्य दहीहंडी महोत्सव आयोजित केला असल्याने यातून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर इंदापूरच्या नगरीचे शेठ संबोधले जाणारे भरत शहा आपली ताकद दाखवून देणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

इंदापूरच्या राजकारणात शहा परिवाराचे नांव आद्यक्रमाने घेतले जाते. तसं इंदापूर शहराच्या विकासात ही त्यांच योगदान आहे. स्वर्गीय गोकुळदास शहा यांनी कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलयं.कर्मयोगी साखर कारखाना उभारणीत गोकुळशेठ यांचा सक्रिय सहभाग होता. म्हणूनच त्यांनी उपाध्यक्षा पासून अनेक पदे भुषवली होती.

अगदी त्याच पध्दतीने भरत शहा यांनी आपली राजकीय कारकिर्द गाजवली आहे.भरत शहा हे इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन, इंदापूर नगरपषदेचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक राहिलेले आहेत. तर सध्या भरत शहा यांकडे कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद आहे. तर मुकुंद शहा हे देखील इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, कर्मयोगीचे संचालक राहिले असून चालू पंचवार्षिक मध्ये मुकुंद यांच्या पत्नी अंकिता मुकुंद शहा यांनी इंदापूर शहराच्या नगराध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडली आहे. अंकिता शहा यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात इंदापूर नगरपरिषदेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देखील प्राप्त झालेत. त्यामुळे इंदापूर नगरपरिषदेचा डंका दिल्ली दरबारी देखील वाजला. 

इंदापूर तालुका आणि शहरवासीयांसोबत शहा परिवारचे आपुलकीचे संबंध आहेत. प्रत्येकाच्या मदतीला वेळप्रसंगी धावून येणारा आणि प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध जपणारे राजकारणातील धुरंदर घराणे म्हणून शहा परिवाराचा नांवलौकीक आहे.ना.रा.बप्पा आणि गोकुळदास शहा यांपासूनचं शहा परिवाराची कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या घराण्याशी नाळ जोडली गेली. पुढे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांसोबत ही नाळ जोडून राहिली. मात्र मागील काही महिन्यांपासून शहा आणि पाटील परिवारात अंतर पडले असून शहा व पाटील परिवार एकमेकांपासून दुरावल्याचे चित्र आहे. मागील वर्षी गोकुळदास शहा यांचे निधन झाले.याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा.सुप्रिया सुळे यांसह आमदार दत्तात्रय भरणे यांनी शहा परिवारास भेटी दिल्या. देशाचे नेते थेट शहा बंधुंच्या भेटीला आल्याने राजकारणात विविध तर्क वितर्क लावले जात होते. मात्र शहा परिवाराने ही भेट केवळ सांत्वनपर असल्याचे सांगितले आणि शहा परिवार राष्ट्रवादी सोबत जाणार या चर्चांवर अखेर पडदा पडला. 

तर दुसरीकडे इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना शहा बंधुंच्या भुमिकेकडे शहरवासीयांच्या नजरा लागुन आहेत. शहा परिवार राष्ट्रवादी सोबत उघडपणे गेला नसला तरी राजकारणात कधीही काहीही होऊ शकते हे महाराष्ट्राला नवे नाही. 

भरत शहा मित्र परिवाराकडून दहीहंडी निमित्ताने प्रथमचं भरत शहा चषक २०२३ आयोजित करण्यात आलेय. जरी हा कार्यक्रम सांस्कृतिक असला तरी त्याला राजकिय किनार मात्र नक्की आहे.त्यामुळे उद्याच्या मंचावर कोणते चेहरे असणार याकडे इंदापूर वासीयांची नजर लागून आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow