इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृषी जनावरे घोडे बाजार डॉग शो प्रदर्शनाला सुरुवात
आय मिरर(देवा राखुंडे)
पुणे जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे हे कृषी प्रदर्शन घेत असतात हे कृषी प्रदर्शन शेतकरी व पशुपालकांसाठी पर्वणी असल्याचे मत आमदार यशवंत माने यांनी व्यक्त केले.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या 24 जानेवारी ते 28 जानेवारी पर्यंतच्या पाच दिवसीय भव्य कृषी जनावरे प्रदर्शन, घोडेबाजार व डॉग शोच्या उद्घाटन प्रसंगी आमदार यशवंत माने मार्गदर्शन करताना बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर ,निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव, आप्पासाहेब जगदाळे, भरत शहा, मधुकर भरणे, वसंत मोहोळकर, ॲड.तेजसिंह पाटील, विलास वाघमोडे, कांतीलाल झगडे, विशाल बोंद्रे ,राहुल जाधव यांच्यासह सर्व पक्षातील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार माने म्हणाले की , इंदापूर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांच्या मालाला चांगला दर मिळवण्यासाठी बाजार समितीचे सर्व संचालक कामगार प्रामाणिकपणे काम करत असतात.मागील निवडणूकीत सर्व पक्षातील उमेदवारांना संचालक पदावर संधी देऊन एकत्रितरित्या काम केले जाते यापुढेही अशाच पद्धतीने सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप म्हणाले की, कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी या बाजार समितीची स्थापना केली. त्यानंतर अनेक जुन्या जाणत्या ज्येष्ठ मंडळींनी तसेच जे सभापती, संचालक राहिले त्यांनी या बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.आज या बाजार समितीचे तालुक्यात चार गावामध्ये उपबाजार सुरू झाले आहेत. अनेक व्यापाऱ्यांना गाळे उपलब्ध करून दिले आहे. या कृषी महोत्सवातून आधुनिक शेती कशा पद्धतीने करावी याच्यासाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती दत्तात्रय फडतरे यांनी केले. तर आभार बाजार समितीचे उपसभापती रोहित मोहोळकर यांनी मानले.
यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत बाजार समितीचे सभापती विलासराव माने,माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, उपसभापती रोहित मोहोळकर, संचालक तुषार जाधव, संदीप पाटील, संतोष गायकवाड, संतोष वाबळे ,दशरथ पोळ, संग्रामसिंह निंबाळकर, गणेश झगडे ,रौनक बोरा, अनिल बागल, आबा देवकाते,सुभाष दिवसे, मनोहर ढुके, बाजार समितीचे प्रभारी सचिव संतोष देवकर यांच्यासह आदींनी केले. यावेळी तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय सांस्कृतिक प्रदेशाला सुरुवात करण्यात आली ही स्पर्धा रविवार पर्यंत सुरू राहणार आहे.
घोड्यांच्या चित्तथरारक कसरतीने वेधले लक्ष...
कृषी प्रदर्शनात जनावरे, घोडेबाजार यांचे उद्घाटन झाल्यानंतर रफिक रायडर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध जातीच्या अत्यंत चपळ घोड्यांचे चित्त थरारक ऑलिंपिक प्रात्यक्षिके दाखवत उपस्थितांची मने जिंकली.
कृषी प्रदर्शनात दिड टनाचा एक कोटीचा गजेंद्र रेडा व ऑल इंडियन चॅम्पियन एक कोटीचा रिबेल घोडा ठरतोय आकर्षण...
या कृषी महोत्सवात अत्याधुनिक शेती साधने व शेती उपयोगी वस्तूंची जवळपास दोनशे स्टॉल उपलब्ध आहेत. तसेच ड्रोन द्वारे औषध फवारणी, जातिवंत जनावरांचे प्रदर्शन ,घोडे चाल स्पर्धा व नाचकाम स्पर्धा, डॉग शो, शालेय सांस्कृतिक स्पर्धा ,महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम, महिलांसाठी खेळ पैठणीचा तसेच ऑलिंपिक क्रीडा प्रकार प्रात्यक्षिके, बुलेट जीप व घोडा रायडिंगचे विविध ठराविक शो, गृह उपयोगी वस्तू,सौंदर्यप्रसाधने,निवडक खाद्यपदार्थाचे स्टॉल, लहानग्यांसाठी मनोरंजनाचे खेळ या सर्वांसह विशेष आकर्षण ठरत आहेत ते दीड टनाचा एक कोटीचा गजेंद्र रेडा व ऑल इंडिया चॅम्पियन एक कोटीचा रिबेल घोडा.
What's Your Reaction?