श्री छत्रपती जिंकला माळेगावचं काय ? अजित पवार स्पष्ट करणार उद्या भूमिका

आय मिरर
इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केल आहे. नुकत्याच झालेल्या निकालात उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वातील श्री जय भवानी माता पॅनलला सभासदांनी ऐतिहासिक असा कौल दिला. 21 पैकी 21 संचालक मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने श्री छत्रपती कारखान्यावर जाचक पर्वाला सुरुवात झाली आहे.
यानंतर आता खऱ्या अर्थाने चर्चा सुरू झाली आहे ती बारामती तालुक्यातील श्री माळेगाव सहकारी साखर कारखान्याची. बारामती तालुक्यातील श्री माळेगाव सहकारी साखर कारखाना आणि श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो. सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून बुधवार दिनांक 21 मे पासून यासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याची आर्थिक स्थिती पाहता श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी अस आवाहन केलं होतं. मात्र महायुतीतील मित्र पक्षाच्या काही स्थानिक नेत्यांनीच अजित पवार यांना या निवडणुकीत आव्हान दिलं. अखेर निवडणूक लागली मात्र यामध्ये अजित पवारांनी पुन्हा आपली सत्ता कायम राखली.
आता श्री माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत अजित पवार यांची नेमकी काय भूमिका असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या गुरुवारी 22 मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतील राष्ट्रवादी भवनामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यात अजित पवार श्री माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
दुसरीकडे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं ऐनवेळी माघार घेतली. संचालक मंडळाच्या जागा वाटपात आम्हाला स्थान दिलं नसल्याने आम्ही या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष एडवोकेट तेजसिंह पाटील यांनी घोषित केले. दुसरीकडे ज्या पृथ्वीराज जाचकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने श्री छत्रपती कारखान्याची निवडणूक लढवण्याचा मनसुबा आखला होता तेच पृथ्वीराज जाचक ऐनवेळी अजित पवार यांना जाऊन मिळाले. त्यांनी अजित पवारांशी युती केली, अजित पवारांनीही त्यांना श्री छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदाचा शब्द दिला. त्यामुळे ठोस असा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे नसल्याने सुप्रिया सुळे यांनी थेट पृथ्वीराज जाचक यांच्या भूमिकेला आपला पाठिंबा दर्शवला.
त्यामुळे उद्या होणाऱ्या श्री माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागल आहे. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या बाबतीत जे धोरण शरद पवार गटाने अवलंबले तेच धोरण माळेगाव कारखान्याच्या बाबतीत अवलंबणार की वेगळी भूमिका असणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे.
दुसरीकडे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत निवडणूक लढवावी अशी भूमिका जर सभासद शेतकऱ्यांची असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी असू अशी स्पष्ट भूमिका यापूर्वीच खासदार सुप्रिया सुळे आणि युवा नेते युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे श्री माळेगाव साखर कारखान्याच्या बाबतीत शरद पवार गट कोणती भूमिका घेतो हे पाहणं महत्वाचं असेल.
तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष चंदरराव तावरे आणि रंजनकुमार तावरे यांची भूमिका देखील महत्त्वाची असणार आहे. या दोघांनीही माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे नेतृत्व केलेले आहे. सध्या हे दोन्ही बलाढ्य नेते कारखान्याच्या बाबतीत विरोधी बाकावर आहेत. चंदरराव तावरे आणि रंजनकुमार तावरे हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. दुसरीकडे अजित पवार हे भाजपसोबत महायुतीत सत्तेत आहेत. त्यामुळे तावरे गटाची श्री माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत नेमकी काय भूमिका राहिल हे देखील पहावं लागेल.
What's Your Reaction?






