केंद्रीय मंत्र्यांची मुलगीच असुरक्षित तर मग सर्वसामान्यांचे काय ? पुण्यातील घटनेनंतर रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेड

Mar 2, 2025 - 15:24
 0  613
केंद्रीय मंत्र्यांची मुलगीच असुरक्षित तर मग सर्वसामान्यांचे काय ? पुण्यातील घटनेनंतर रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेड

आय मिरर

पुण्यात महिला अत्याचाराच्या घटनेनंतर चक्क केंद्रीय राज्यमंत्र्यांच्याच मुलीचा छेडखानी करण्याचा धक्कादायक प्रकार हा जळगाव मध्ये समोर आला आहे. केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी असुरक्षित असेल तर मग सर्वसामान्य महिलांच्या सुरक्षेचा काय असा प्रश्न निर्माण होत असून या घटनेवरून राज्यात पुन्हा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईच्या यात्रा महोत्सवात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी छेडखानी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून रक्षा खडसे यांच्या सुरक्षारक्षकाने अडवण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षा रक्षकासही टवाळ खोरांनी दमदाटी व धक्काबुक्की केली आहे. 

याप्रकरणी सुरक्षारक्षक पोलिसाच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलीस स्टेशन मध्ये 353 अंतर्गत टवाळखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र मुलीची छेडखानी करूनही पोलिसांनी या प्रकरणी कुठलीही कठोर कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी थेट मुक्ताईनगर पोलीस स्टेशन गाठत टवाळखोर तरुणांवर तातडीची कारवाईची मागणी केली आहे. 

तर याच टवाळखुरांकडून अन्य मुलींची ही छेडखानी केल्याचा आरोप रक्षा खडसे यांनी केला असून मंत्री म्हणून नव्हे तर आई म्हणून या प्रकरणी आपण न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनला आल्याचे स्पष्टीकरण रक्षा खडसे यांनी दिले आहे. 

राज्यात वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांवरून महिलांच्या सुरक्षतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच पुण्याच्या घटनेवरून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालेली असताना केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्याच मुलीच्या छेडखानीच्या प्रकारानंतर राज्यातील महिलांच्या सुरक्षतेबाबत किती गांभीर्याने लक्ष दिले जाते ? हे स्पष्ट होतंय. 

रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते; मुख्यमंत्री संतप्त...

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड करणारे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा धक्कादायक खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या घटनेतील कुणालाही सोडणार नाही असा संतप्त इशाराही मुख्यमंत्र्‍यांनी दिला आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीसांनी जळगावातील घटनेवर भाष्य केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुर्दैवाने त्या घटनेत एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत ज्यांनी अतिशय वाईट प्रकारचं काम केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून काहींना अटकही झाली आहे. इतरांनाही अटक केली जाईल. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे त्रास देणे, छेडछाड करणे हे अत्यंत चुकीचे आहे. कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितले.

महिला सुरक्षेबाबत आम्हीही कमी पडतोय रक्षा खडसेंची कबुली...

रक्षा खडसे यांची मुलगी आपल्या मैत्रिणींसह मुक्ताईनगर कोथळी येथील संत मुक्ताईच्या मंदिरात शिवरात्रीच्या यात्रा महोत्सवात गेली होती. यात्रा महोत्सवात असलेल्या पाळण्यांमध्ये अनिकेत भोई,पियुष मोरे, सोहम माळी,अतुल पाटील व किरण माळी या टवाळखोर तरुणांनी छेडखानी केल्याचा आरोप रक्षा खडसे यांच्या मुलीने केला.

याबाबत रक्षा खडसे यांना माहिती मिळतात रक्षा खडसे यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल होऊन कारवाईबाबत पोलिसांना जाब विचारला. केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी सुरक्षित नसेल तर मग सर्वसामान्य महिलांचं काय असा प्रश्न स्वतः रक्षा खडसे यांनी उपस्थित केला असून महिला सुरक्षेबाबत आम्हीही कमी पडत असल्याची कबुली स्वतः रक्षा खडसे यांनी दिली आहे. 

मुलीच्या छेडखाने वरून रक्षा खडसेंच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाईला सुरुवात केली असून अनिकेत भोई, पियुष मोरे, सोहम माळी,अतुल पाटील व किरण माळी या पाच संशयितांविरुदध विनयभंगासह पोस्को अंतर्गत विविध गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणी पोलिसांवर कुठलाही राजकीय दबाव नसून गांभीर्याने प्रकरणात पोलीस कारवाई करत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनी दिली आहे. 

मात्र घडलेला प्रकार हा निंदनीय असून छेडखानी करणारे हे केवळ टवाळखोर नसून गुंड असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला असून टवाळ खोर तरुणांकडून सुरक्षा रक्षक असलेल्या पोलिसालाही मारहाण केल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. 

मुख्यमंत्री कार्यालयातूनच गुंडांना संरक्षण देण्यासंदर्भात येतात फोन....

तर याच घटनेवरून मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या तीन चार वर्षात गुंडगिरी वाढली असून मागील दोन अडीच वर्षात मुख्यमंत्री कार्यालयातूनच गुंडांना संरक्षण देण्यासंदर्भात पोलिसांना फोन येत असल्याचा गंभीर आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे. तर स्थानिक गुंडांना लोकप्रतिनिधी व राजकारण्यांच संरक्षण मिळत असल्याचा आरोप करत नाव न घेता एकनाथ खडसे यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. 

महाराष्ट्रात पोलीस यंत्रणेवर विश्वास राहिलेला नसून आता स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी महिलांना स्वतः घेण्याची गरज असल्याचेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलींबाबत कोणी एवढं धाडस करत असेल तर सर्वसामान्य मुलींचं काय असा प्रश्न देखील एकनाथ खडसेंनी उपस्थित करत सरकारने याबाबत गांभीर्याने कारवाई करण्याची गरज असल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा परत ऐरणीवर आला असून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी व माझी भाचीची छेडखानी झाल्याचा प्रकार संत मुक्ताईच्या यात्रेमध्ये झाला होता. दोन दिवस अगोदर या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवूनही टवाळ खोरांवर पोलिसांकडून साधी कारवाई झाली नसून केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीबाबत हा प्रकार घडत असेल तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातील महिला भगिनींचा काय असा प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी गृहमंत्र्यांना उपस्थित केला आहे. 

तसेच मुक्ताईनगर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी वाढली असून महिलांना कशा पद्धतीने वागणूक दिली जाते या घटनेतून अधोरेखित होत असून पोलिसांनी या प्रकरणात राजकीय दबावातून पाठीशी घालण्याचं काम केल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow