'खरा पाटील असशील तर...', भुजबळांचं मनोज जरांगे पाटलांना आव्हान

Feb 8, 2024 - 15:27
 0  607
'खरा पाटील असशील तर...', भुजबळांचं मनोज जरांगे पाटलांना आव्हान

आय मिरर

मराठा समाजासाठी वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरु आहे, तसंच वेगळा कायदा बनवला जात आहे असं छगन भुजबळ  म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना जाहीर आव्हानही दिलं. हिंमत असेल, खरा पाटील असशील तर मंडल आयोगाच्या विरोधात जा असं ते म्हणाले आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी नाभिक समाजाबद्दल केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचंही म्हटलं. 

मनोज जरांगे पाटील यांनी आपण मंडल आयोगाला विरोध कऱणार नाही. पण जर छगन भुजबळांनी अध्यादेशाला विरोध केला तर मात्र मंडल आयोगाला विरोध करु असं म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले की, "मनोज जरांगे पाटील तुझ्यात हिंमत असेल, खरा पाटील असशील तर मंडल आयोगाच्या विरोधात जा. मंडल आयोग संपवून दाखव. तुम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे आणि त्याचा निर्माता मंडल आहे एवढी तरी अक्कल पाहिजे. एवढी काय अक्कल नाही, त्याला काय बोलणार".

"15,16 तारखेला विधानसभेचं अधिवेशन होणार असून, माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार मराठा आरक्षणासाठी वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरु आहे. वेगळा कायदा बनवला जात आहे. आम्हीतर आधीपासून मराठा समाजाला आरक्षण द्या, ओबीसीला धक्का लागता कामा नये असं सांगत आहोत," असं भुजबळ म्हणाले आहेत. 

नाभिक समाजाने मराठा समाजावर बहिष्कार टाका असं मी म्हटलेलं नाही असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलं आहे. "नाभिक संघटनांनी पत्रक काढून आम्ही मीटिंगला, रॅलीला हजर होतो, पण भुजबळांनी असं कोणतं विधान केलं नसल्याचं सांगितलं आहे. एका गावात एका नाभिक समाजाच्या माणसाने पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे तेथील गावातील मराठा समाजाने या दुकानात केस कापायचे नाहीत असा आदेश काढला. त्यामुळे मी म्हटलं होतं की, गावातील इतर नाभिक बंधूंनी तुम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकला तर आम्ही तुमच्यावर टाकू असं सांगावं. हे सगळ्यांनी मान्य केलं. सगळ्या संघटनांनी पत्रकंही काढली. पण काही खोडसाळ लोकांनी चुकीचा अर्थ काढत वेगळं वातावरण निर्माण केलं. सगळ्या मराठ्यांचा अपमान झाला, सगळ्या नाभिकांना आदेश देण्यात आला असं सांगण्यात आलं. तो फक्त एका गावापुरता मर्यादित होता. पाथर्डीमधील हे गाव होतं," असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलं. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow