ऑनलाईन गेम ड्रीम 11 वर दीड कोटी रुपये जिंकणाऱ्या पुण्यातील या अधिकाऱ्याची पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे करणार चौकशी,अडचणी वाढण्याची शक्यता

Oct 12, 2023 - 06:46
Oct 12, 2023 - 06:48
 0  30464
ऑनलाईन गेम ड्रीम 11 वर दीड कोटी रुपये जिंकणाऱ्या पुण्यातील या अधिकाऱ्याची पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे करणार चौकशी,अडचणी वाढण्याची शक्यता

आय मिरर

ऑनलाईन गेम ड्रीम 11 वर दीड कोटी रुपये जिंकणारे पिंपरी पोलीस दलातील पीएसआय सोमनाथ झेंडे अडचणीत येण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे. प्रशासकीय तसंच कायदेशीर बाबी तपासून पीएसआय सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल, झेंडे यांची चौकशी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती पोलीस जनसंपर्क अधिकारी सतीश माने यांनी दिली आहे.

पुण्याच्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असणाऱ्या सब-इन्सपेक्टर सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम इलेव्हन वर दीड कोटी रुपये जिंकले. मागच्या तीन महिन्यांपासून सोमनाथ झेंडे ड्रीम इलेव्हनवर टीम बनवत आहेत. बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यासाठी झेंडे यांनी ड्रीम इलेव्हनवर टीम लावली होती. सामना संपल्यानंतर सोमनाथ झेंडे यांनी त्यांचा मोबाईल चेक केला तेव्हा त्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. सोमनाथ झेंडे यांची टीम पहिल्या क्रमांकावर आली होती.

ड्रीम इलेव्हनवर दीड कोटी जिंकल्यानंतर सब इन्सपेक्टर करोडपती झाले आहेत, त्यामुळे त्यांचं कुटुंबही खूश झालं आहे. तरीही ऑनलाईन गेमिंग धोकादायक असल्याचं झेंडे यांनी सांगितलं. अशा गेम्सपासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे, कारण याचं व्यसन लागून आर्थिक नुकसानही होऊ शकतं, असं आवाहन सब इन्सपेक्टर सोमनाथ झेंडे यांनी केलं आहे.

हे पैसे मिळाले असले तरी आपण पोलीस दलात राहणार आणि देशसेवा करणार आहे. मिळालेल्या रकमेपैकी काही रक्कम समाजकार्यासाठी वापरणार आहे, तसंच हे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार असल्याचं झेंडे यांनी सांगितलं. सोमनाथ झेंडे हे जेजुरीचे आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow