दौंड मध्ये अकरा महिन्याच्या 'अनवित' चा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू, गेल्या 18 तासापासून सुरू होती शोध मोहीम

आय मिरर
दौंड तालुक्यातील दहिटणे येथून एका ११ महिन्याच्या मुलाला बिबट्या उचलून घेऊन गेल्याची गंभीर घटना बुधवारी 30 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. तेव्हापासून या मुलाचा वनविभाग स्थानिक नागरिक आणि पोलीस खात्याच्या माध्यमातून शोध सुरू होता. अखेर या मुलाचा आज गुरुवारी दुपारी बारा ते सव्वा बाराच्या सुमारास शोध लागला.
खरंतर या मुलाच्या शोधकामी गेल्या 18 तासापासून वनविभाग स्थानिक नागरिक आणि पोलीस खात्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. आखिरत्या प्रयत्नांना यश आलं मात्र बिबट्याने ओढून नेलेला मुलगा हा मृतावस्थेत आढळून आला.अनवित धुळा भिसे असं या अकरा महिने वयाच्या मुलाच नाव असून बिबट्याच्या हल्ल्यात याचा मृत्यू झालाय.
तब्बल 31 तासानंतर एका उसाच्या शेतामध्ये या मुलाच्या शरीराचा काही भाग यासोबतच रक्ताने माखलेले कपडे पायातील पैंजण अशा काही वस्तू वन विभागाच्या आणि पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांना व स्थानिक नागरिकांना मिळून आल्या.ते पाहून भिसे कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला तर उपस्थितांना ही अश्रू अनावर झाले.
दहिटणे येथील बापूजीबुवा वस्ती येथ भिसे कुटुंबीय बकऱ्यांच्या वाड्यावर असताना काल बुधवारी सकाळच्या वेळी अनवित धुळा भिसे या अकरा महिने वयाच्या मुलाला बिबट्याने आईच्या समोरुन ओढून नेले होते. बिबट्या मुलाला ओढून घेऊन जात असताना त्या मुलाच्या आईने आरडाओरडा केला मात्र तो पर्यंत बिबट्या मुलाला घेऊन पसार झाला होता.
यानंतर तात्काळ दौंड वन विभाग यवत पोलीस आणि स्थानिक नागरिक यांनी या मुलाच्या शोधकामी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उसाच्या शेतामध्ये अक्षरशा सऱ्या पिंजून काढल्या.या कामी डॉग्सस्कॉड ची देखील मदत घेण्यात आली. तर ड्रोन च्या मदतीने ही शोध सुरू होता. यासोबतच पुणे येथील रेस्क्यू टीम देखील मदतीला होती मात्र अनवित चा शोध लागत नव्हता. बुधवारी रात्री उशिरा ही मोहीम थांबवण्यात आली.
आज गुरुवारी एक मे रोजी सकाळी सहा वाजल्यापासून शोधकारी सुरू झाले.18 तासापासून दौंड वन वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यासोबतच त्यांचे कर्मचारी, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख व त्यांचे अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक नागरिक आसपासच्या परिसरातील सर्व ऊसाचे शेत पिंजून काढत होते. आज अखेर दुपारी बारा ते सव्वा बाराच्या दरम्यान उसाच्या एका शेतात या मुलाच्या शरीराचे काही अवशेष, त्याचे रक्ताने माखलेले कपडे पायातील पैंजण आढळून आल्याने अखेर अनवित ची शोध मोहीम थांबली.
"काल घटना घडल्यापासून स्थानिक नागरिक वन आणि पोलीस विभागाच्या माध्यमातून मुलाच्या शोधकामी शर्तीचे प्रयत्न सुरू होते. वेळप्रसंगी डॉग्सस्कॉड ची देखील मदत घेण्यात आली.आज एका उसाच्या शेतात बारा ते सव्वा बाराच्या सुमारास मुलाच्या शरीराचे काही अवशेष अंगावरील कपडे आढळून आलेले आहेत. यानंतर त्या वस्तू आणि अवशेष ताब्यात घेण्यात आल्या असून ग्रामीण रुग्णालय यवत, यवत पोलीस यांच्या मदतीने ससून रुग्णालय पुणे येथे वैद्यकीय अहवालासाठी पाठवण्यात आल्या असून बिबट्याच्या शोधकामी वनविभागाची पुढील मोहीम सुरू असून लवकरात लवकर या बिबट्याला जेरबंद करण्यात येईल." - राहुल काळे,वनपरिक्षेत्र अधिकारी दौंड
What's Your Reaction?






