इंदापुरात विद्या प्रतिष्ठानचा कौशल्य विकासात पुढाकार ,ग्रामीण भागात स्थापन केलं जाणार ड्रोन पायलट ट्रेनिंग सेंटर

May 23, 2025 - 07:33
 0  182
इंदापुरात विद्या प्रतिष्ठानचा कौशल्य विकासात पुढाकार ,ग्रामीण भागात स्थापन केलं जाणार ड्रोन पायलट ट्रेनिंग सेंटर

आय मिरर 

पुण्याच्या इंदापूरच्या विद्या प्रतिष्ठान कॉलेजात ड्रोन पायलट ट्रेनिंग चे केंद्र तयार करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधीची कवाड खुली करून देण्यात महाविद्यालयाने गरुडझेप घेतली आहे. गरुडा एरोस्पेससोबत सामंजस्य करार करून लवकरच कॉलेजमध्ये ड्रोन पायलट ट्रेनिंग सेंटर सुरू होणार आहे.या उपक्रमामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण घेण्याची संधी निर्माण होणार आहे.

याशिवाय जर्मन भाषा प्रशिक्षण च्या माध्यमातून परदेशी करिअरची संधी उपलब्ध होतील. असं मत विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुजय देशपांडे यांनी व्यक्त केले.ते कॉलेज मधील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

डॉ.देशपांडे म्हणाले की,विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजने शैक्षणिक क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगारक्षम, सक्षमीकरण आणि कौशल्याधारित शिक्षण पुरवण्याचा ध्यास घेतला आहे. संस्थेमार्फत एम.के.सी.एल. च्या "I-Like" ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध क्रेडिट बेस्ड कोर्सेस मोफत दिले जात आहेत. हे कोर्सेस अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्समध्ये नोंदवले जात असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि औद्योगिक उंची वाढवण्यासाठी ते उपयुक्त ठरत आहेत.

भारत सरकार मान्य "आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र"

विद्यार्थ्यांच्या कौशल्य वृद्धीसाठी मोठी संधी निर्माण करत आहे. या केंद्रांतर्गत सध्या CNC Programming तसेच PCB Making हे दोन कोर्सेस सुरु असून ते संपूर्णतः मोफत आहेत. यामधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे कौशल्ये आत्मसात करता येतात. जिल्हा कौशल्य केंद्रामार्फत या कोर्सेसनंतर विद्यार्थ्यांना नोकरीसाठी सहाय्य केले जाते. आतापर्यंत 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे.

स्टार्टअप संस्कृतीला चालना...

स्टार्टअप संस्कृतीला चालना देण्यासाठी महाविद्यालयाने तीन क्षेत्रांतील कंपन्यांची स्थापना करण्याचा मानस ठेवलेला आहे.विद्यार्थ्यांना उद्योगशीलतेकडे वळवण्यासाठी कॉलेजने कंप्युटर, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग या शाखांमध्ये स्वतंत्र स्टार्टअप कंपन्या रजिस्टर करण्याचा मानस व्यक्त केला आहे. यामुळे ग्रामीण भागातील तरुण स्वतःचे उद्यम सुरू करण्यास प्रेरित होतील.

महाविद्यालयात सुरु असलेल्या जर्मन भाषा कोर्स मुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जर्मनीसारख्या देशात शिष्यवृत्तीच्या माध्यमातून उच्च शिक्षणाच्या तसेच नोकरीच्या संधी प्राप्त होत आहेत. हा कोर्स केवळ भाषा शिक्षणापुरता मर्यादित नसून, तो आंतरराष्ट्रीय करिअरच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना तयार करतो.

महाविद्यालयातील विद्यार्थी एल अँड टी डिफेन्स, बजाज ऑटो, भारत फोर्ज, कमिन्स इंडिया, लक्ष्मी कन्स्ट्रक्शन, विप्रो यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये निवडले गेले आहेत. विशेष म्हणजे, विप्रो कंपनीने निवडलेल्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा नंतर बिट्स पिलानी या नामांकित संस्थेतून B.Tech करण्यासाठी प्रायोजित केले आहे.

सायबर गुन्ह्यांचे विश्लेषण करण्यासाठी महाविद्यालयाचा पुढाकार...

सामाजिक बांधिलकी जपतानाच अतिशय महत्वाच्या सायबर क्राईम विश्लेषणात इंदापूर पोलीस स्थानकासोबत सायबर गुन्ह्यांचे विश्लेषण करण्यासाठी महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. सायबर क्राईमचे डेटा अ‍ॅनालिसिस आणि मशीन लर्निंग वापरून विश्लेषण करून संबंधित माहिती पुणे येथील संशोधन केंद्राला दिली जाणार आहे. हे प्रकल्प कंप्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow