शनिवारी 23 मार्चला शरद पवार,संजय राऊत, बाळासाहेब थोरातांची इंदापुरात जाहीर सभा ! हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचं महारुद्र पाटलांचं आवाहन

Mar 19, 2024 - 19:35
 0  780
शनिवारी 23 मार्चला शरद पवार,संजय राऊत, बाळासाहेब थोरातांची इंदापुरात जाहीर सभा ! हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचं महारुद्र पाटलांचं आवाहन

आय मिरर (देवा राखुंडे)

देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांची 23 मार्च रोजी इंदापूर शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडणार आहे.या सभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात,आमदार संग्राम थोपटे,आमदार संजय जगताप उपस्थित राहणार असून सकाळी दहा वाजता ही सभा पार पडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी मंगळवारी 19 मार्च रोजी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

विशेष म्हणजे या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार,युवा नेते युगेंद्र पवार आणि युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख हे देखील उपस्थित राहून संबोधन करणार आहेत.

महारुद्र पाटील म्हणाले की,गेल्या दहा वर्षांमध्ये भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आले. दहा वर्षात केलेल्या घोषणांपैकी एकही घोषणा आहे सरकार पूर्ण करू शकले नाही. तीनशे रुपयाचा सिलेंडर अकराशे रुपये झाला. 50-55 रुपये लिटरच्या पेट्रोलने शंभरी पार केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून युवकांना नोकरी देऊ अशा अनेक घोषणा या सरकारने केल्या होत्या. मागील 70 वर्षाच्या काळात भारत सरकारने देशात स्थापन केलेल्या कंपन्या विकण्याचे काम या भाजप सरकारकडून झाले आहे. आज देशात आणि राज्यात भाजपा विरोधात मोठा रोष तयार झाला आहे. शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली याचा रोष दिसून येतो. या सर्व बाबींवर संबोधन करण्यासाठी माजी कृषिमंत्री शरद पवार आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या 23 मार्चला या शेतकरी मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येने इंदापूर तालुक्यातील शेतकरी बंधू-भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन महारुद्र पाटील यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष एडवोकेट तेजसिंह पाटील, राज्याचे कार्यकारणी सदस्य अमोल भिसे, ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, शहराध्यक्ष एडवोकेट इनायत अली काझी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महादेव सोमवंशी,सिकंदर बागवान,राजू भाई शेख,विकास खिलारे,दादासाहेब थोरात,यांसह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow