चंद्रराव तावरे की अजित पवार ? माळेगावचे सभासद कोणाच्या गळ्यात टाकणार चेअरमन पदाची माळ

Jun 21, 2025 - 17:21
 0  669
चंद्रराव तावरे की अजित पवार ? माळेगावचे सभासद कोणाच्या गळ्यात टाकणार चेअरमन पदाची माळ

आय मिरर

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीमध्ये निळकंठेश्वर पॅनल आणि सहकार बचाव शेतकरी पॅनल या दोन्ही पॅनलने आपले चेअरमन पदाचे उमेदवार जाहीर केले असून उपमुख्यमंत्री की सहकार महर्षी कोणाच्या गळ्यात चेअरमन पदाची माळ माळेगावचे सभासद टाकणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सलग दोन वर्ष महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊसाला भाव देणारा कारखाना म्हणून माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे.या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी 22 जून रोजी मतदान होत आहे.

या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी गट अशी लढत होत असून शरद पवार गटाने देखील या निवडणुकीत आपले 20 उमेदवार उभा करून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. तर अपक्षांनी देखील आपले उमेदवार उभा केले आहेत.

निळकंठेश्वर पॅनल मधून ब वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार ही निवडणूक लढवत असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले.

निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचार शुभारंभ जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना या कारखान्याचा चेअरमन मीच होणार असे सभेत जाहीर केले त्यावेळी अजित पवारांचे मोठ्या जल्लोषात उपस्थित सभासदांनी स्वागत केले.

तर सहकार शेतकरी बचाव शेतकरी पॅनलच्या सांगता सभेत माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांनी आमच्या पॅनल मधून चंद्रराव तावरे हे चेअरमन होणार असे घोषित केले यावेळी lउपस्थित सभासदांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.

मुख्यमंत्री अजित पवार हे 1984 मध्ये इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवून संचालक झाले होते. तेथूनच अजित पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली होती.मला एकेकाळी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व्हायचे होते मात्र पृथ्वीराज बापू जाचक आणि प्रशांत काटे यांनी मला चेअरमन होऊ दिले नाही, अशी खदखद ही अजित पवार यांनी जाहीर सभेत व्यक्त केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्यात निवडणूक लढवल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची देखील झाली आहे. या कारखान्याची निवडणुक चौरंगी होत असून 90 उमेदवार हे आपले नशीब आजमावत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नीळकंठेश्वर पॅनल तर चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे या गुरु शिष्याच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव शेतकरी पॅनल मैदानात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचं बळीराजा सहकार बचाव पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समितीचे कष्टकरी शेतकरी पॅनल अशी चौरंगी लढत या निवडणुकीत होत आहे.

कधीकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व्हायचं होतं मात्र चेअरमन होता आलं नाही. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होण्यासाठी निवडणूक लढवत आहेत. तर दुसरीकडे सहकार महर्षी चंद्रराव तावरे हे दुसऱ्या पॅनलचे चेअरमन पदाचे उमेदवार आहेत. त्यामुळे चंद्रराव तावरे चेअरमन होणार की अजित पवार यांचे अपुरे राहिलेले चेअरमन होण्याचे स्वप्न पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow