BARAMATI बारामती वाहतूक पोलीस तीन दिवसापासून तिच्या मागावर होते अखेर तिला पकडलंच ! काय आहे प्रकरण 

May 31, 2025 - 15:15
May 31, 2025 - 15:19
 0  4898
BARAMATI बारामती वाहतूक पोलीस तीन दिवसापासून तिच्या मागावर होते अखेर तिला पकडलंच ! काय आहे प्रकरण 

आय मिरर   

तीन दिवसांपासून काळ्या काचा, नंबर प्लेटशिवाय आणि भरधाव वेगाने शहरात भरकटणाऱ्या एका संशयित चारचाकी वाहनाचा अखेर बारामती वाहतूक पोलिसांनी छडा लावला आहे. तीन दिवसांच्या पाठलागानंतर ही गाडी ताब्यात घेऊन संबंधित चालकावर कडक कारवाई करण्यात आली आहे.

वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मे रोजी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे वाहतूक पोलीस जवान सुभाष काळे, प्रशांत चव्हाण, प्रदीप काळे, रूपाली जमदाडे आणि प्रज्योत चव्हाण यांच्यासह काळ्या काचा असलेल्या वाहनांवर कारवाई करत होते.

याच वेळी भिगवण चौकातून काळया काचा असलेली आणि नंबर प्लेट नसलेली एक चारचाकी भरधाव वेगाने जाताना दिसली. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ती गाडी थांबली नाही आणि वेगाने निघून गेली.

यानंतर ती गाडी सिटी इन चौकात थांबवण्यासाठी पोलीस निरीक्षक यांनी वाहतूक पोलीस स्वाती काजळे यांना कळविले. काजळे यांनीही सिटी इन चौकात गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, पण वाहनाने पुन्हा भरधाव वेग घेतला. पुढे, (दि.२८ मे) रोजी तीच गाडी गांधी चौकात वाहतूक पोलीस सीमा घुले आणि रूपाली जमदाडे यांना दिसली, मात्र त्या वेळीही ती थांबवता आली नाही.

या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी जवान सुधाकर जाधव आणि अजिंक्य कदम यांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच परिसरातील नागरिकांची विचारपूस करून संबंधित वाहनाविषयी सविस्तर माहिती मिळवली. अखेर बारामती शहरातच ती चारचाकी शोधून काढण्यात आली आणि पोलिसांनी ताब्यात घेतली. 

कृष्णा अभिजीत क्षीरसागर रा. माऊली नगर प्रगती नगर रोड बारामती हा चालक ती गाडी चालवत होता आणि त्या गाडीचा वाहन क्रमांक MH 06 AZ 8555 असा असल्याचे तपासात समोर आले.

सदर वाहनावर काळ्या काचा, नंबर प्लेट नव्हती, विमा नव्हता तसेच पोलीस मॅन्युअलनुसार कोणतीही पूर्तता करण्यात आलेली नव्हती. यामुळे वाहनचालकावर ३५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, बेदारकारपणे वाहन चालवणे या प्रकरणी कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे. 

सदर गाडीच्या काळया काचा कमी करण्यात आल्या असून खूप मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टिम सुद्धा काढण्यात आलेली आहे. सध्या सदरची गाडी बारामती वाहतूक शाखा या ठिकाणी डिटेन करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या वाहतूक पथकाने केली.

"तसं पाहायला गेलं तर बाब मोठी आहे आणि छोटी ही आहे परंतु कायद्याला न जुमानता पोलिसांच्या आदेशाला न मानता टुकारगिरी करणे याचे लक्षण दिसून आलं त्यामुळे आपण मोठी कारवाई केली.नागरिकांच्यात यामुळे योग्य संदेश जातो." - चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक बारामती वाहतूक शाखा

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow