इंदापूरचा सन 2024 चा आमदार भाजपचा असेल : हर्षवर्धन पाटील

Mar 2, 2024 - 19:04
 0  224
इंदापूरचा सन 2024 चा आमदार भाजपचा असेल : हर्षवर्धन पाटील

आय मिरर(देवा राखुंडे)

बारामती लोकसभा मतदार संघाचे महायुतीतील जागावाटप तसेच उमेदवार अद्यापी जाहीर झालेला नाही. या जागावाटपा नंतर भाजपच्या वरिष्ठांशी सविस्तर चर्चा होईलच. मात्र इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा सन 2024 चा आमदार हा भारतीय जनता पार्टीचा असेल, यामध्ये तडजोड होणार नाही, अशी स्पष्ट व रोखठोक भूमिका भाजप नेते, माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी निमगाव केतकी येथील भाजपच्या बूथ मेळाव्यात शुक्रवारी (दि.1) जाहीर केली. दरम्यान, या मेळाव्यामध्ये इंदापूर विधानसभा संघाचे सन 2024 चे आमदार भाजपचे हर्षवर्धन पाटील असतील, असे भाषणांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जाहीरपणे सांगितले.

निमगाव-केतकी (ता. इंदापूर) येथे इंदापूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने “ संकल्प 2024 : संकल्प विजयाचा” या कार्यक्रमाअंतर्गत निमगाव-निमसाखर जि. प. गटातील भाजपा बूथ अध्यक्ष, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला. सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी मार्गदर्शन केले.      

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान करणेसाठी देशभरातील भाजप कार्यकर्ते सज्ज झाले झाले आहेत. देशात 400 प्लस व राज्यात 45 प्लस जागांचे उद्दिष्ट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींच्या नियोजनाखाली निश्चितपणे पूर्ण होईल. त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी सरकारच्या योजनांची माहिती घरोघरी जाऊन द्यावी.विरोधकांनी मला फिरू देणार नाही, अशा केलेल्या टीकेची हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात खिल्ली उडवली. भाजपची ताकद वाढली पाहिजे अशी सगळ्यांची भूमिका आहे, असे ते म्हणाले.            

इंदापूर तालुक्याचा सर्वच क्षेत्राचा विकास सध्या ठप्प झाला आहे. फक्त तालुक्यात रस्त्यांच्या कामासाठी निधी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. कमिशन पद्धतीमुळे रस्त्यांची कामे निकृष्ट होत असल्याने, त्यास विद्यमान लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला. रस्त्यांसाठी आलेला निधी थातुर-मातुर कामे उरकून कोणाची खिशात जात आहे? ठेकेदारांनी निकषाप्रमाणे दर्जेदार कामे करावीत. शेतीसाठी पाणी, आरोग्य, शिक्षण, सहकार, कृषी-प्रक्रिया, औद्योगिकरण, रोजगार आदीमध्ये तालुक्याची गेल्या दहा वर्षात पिछेहाट झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.      

इंदापूर तालुका भाजपचे लक्ष व दिशा स्पष्ट असून, ऑक्टोबर 24 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये इंदापूर मतदारसंघातून भाजपचा आमदार निवडून जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहनही भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी केले.

राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्राला अधिकाधिक मदत करण्यात येईल, त्याचबरोबर तालुक्यात साखर उद्योग, दुग्ध व्यवसाय यासाठीही मदत केली जाईल, असे भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.  

याप्रसंगी पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी भाषणात तालुक्याच्या सद्य:स्थितीचा आढावा घेत विरोधकांवर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अपयशी ठरल्याची टीका केली. राजकारणात टीका करताना वैचारिक पातळी सोडू नका, अन्यथा ठाकरे भाषेत जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही भाषणात अंकिता पाटील ठाकरे यांनी दिला.

यावेळी काही कार्यकर्त्यांनी बारामती लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराने कमळ चिन्हावरती निवडणूक लढवावी, अशी मागणी केली.  

प्रास्ताविक नानासाहेब शिंदे यांनी केले. यावेळी माजी सभापती अंकुश जाधव, विलासराव वाघमोडे, देवराज जाधव, अँड. शरद जामदार, मोहन दुधाळ, माणिक भोंग, तुषार खराडे यांनी मनोगत व्यक्त केले. या सर्वांनी इंदापूरचे आगामी आमदार भाजपचे हर्षवर्धन पाटील असतील असे भाषणात स्पष्टपणे सांगितले. या मेळाव्यास नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांचे सह निमसाखर-निमगाव गटातील मान्यवर पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अमर निलाखे व नितीन भोसले यांनीतर आभार किशोर पवार यांनी मानले.

भाऊ,आता 5 व्या वेळी फसू नका - भाजप कार्यकर्ते झाले भावनाविश !

बारामती लोकसभेसाठी सन 2004, 2009, 2014, 2019 या 4 निवडणुकांत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा हर्षवर्धन पाटील यांनी प्रामाणिकपणे प्रचार केला. मात्र त्यानंतर फक्त सहा महिन्याच्या फरकाने झालेल्या 4 ही विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञतेची जाणीव न ठेवता, विधानसभेला हर्षवर्धन पाटील यांना विरोध करण्याचे काम केले. याची सल इंदापूर तालुक्यातील भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये खोलवर रुजली आहे. त्यामुळे या मेळाव्यामध्ये प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्यांने भाषणामध्ये भाऊ,आता पाचव्यांदा फसवू नका, असे भावनाविश होत आवाहन केले. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow