RCB हरली अन् दरोड्याचा बेत फसला, पण अखेर बँक फोडलीचं ! इथे पडला देशातील सर्वात मोठा दरोडा

Jun 30, 2025 - 13:05
Jun 30, 2025 - 13:07
 0  406
RCB हरली अन् दरोड्याचा बेत फसला, पण अखेर बँक फोडलीचं ! इथे पडला देशातील सर्वात मोठा दरोडा

आय मिरर 

कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यात देशातील सर्वात मोठ्या बँक दरोड पडला असून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, ज्यामुळे पोलिसांपासून ते सामान्य जनतेपर्यंत सर्वांनाच हादरले आहेत. खरं तर, सुमारे महिन्याभरापूर्वी, 25 मे रोजी मंगुली शहरातील कॅनरा बँकेच्या शाखेतून सुमारे 53 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने गायब झाल्याचे आढळून आले होते.

धक्कादायक गोष्ट म्हणजे जिथे चोरी झाली त्या बँकेच्या लॉकरजवळून केशर, हळद आणि ब्लोटॉर्च सारख्या वस्तू सापडल्या. हे एखादे तांत्रिक गोष्टींशी निगडीत असल्याचे सुरूवातील वाटलं होतं पण जसजसा तपास पुढे सरकत गेला तसतशा एकेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आणि अखेर सगळंच रहस्य उलगडलं. ज्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले.

या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. त्यामध्ये बँकेचे माजी व्यवस्थापक विजयकुमार मिरियाला (वय 41) आणि त्यांचे दोन सहकारी – चंद्रशेखर नेरेला (वय 38), जे एका खाजगी कंपनीत काम करतात आणि सुनील नरसिंहलू मोका (वय 40) यांचा समावेश आहे.

बँकेत पोस्टिंगदरम्यानच आखला प्लान

चोरीच्या या प्रकरणाचा कसून तपास करण्यात आला असता हा एक सुनियोजित कट असल्याचे आढळून आले. मुख्य आरोपी बँकेचे माजी व्यवस्थापक विजयकुमार मिरियला यानेच त्याच्या पोस्टिंग दरम्यान या दरोड्याचा पाया रचला होता. मार्च-एप्रिलमध्येच त्याने बँकेच्या चाव्या त्याच्या साथीदारांना सोपवल्या होत्या आणि डुप्लिकेट चाव्या वापरून बँकेत प्रवेश करण्याची तयारी केली होती. कोणालाही संशय येऊ नये म्हणून 9 मे रोजी मिरियला याची ट्रान्स्फर झाल्यानंतर आरोपींनी हा प्लान प्रत्यक्षात आणण्याचे ठरवले.

आरसीबी मॅचशी खास कनेक्शन

सुरुवातीला, 23 मे ही दरोड्याची तारीख निश्चित करण्यात आली होती, कारण त्या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल सामना होता. आणि उत्सवात मग्न असलेल्या लोकांना त्यांच्या हालचाली लक्षात येणार नाहीत, असे आरोपींना वाटले होते. मात्र आरसीबी हरल्याने त्यांनी दरोडा़ टाकण्याची योजना एका दिवसासाठी पुढे ढकलली.

लॉकरजवळ केशर का सोडलं ?

अखेर दरोडा टाकल्यानंतर, आरोपींनी बँकेत केशर, हळद आणि ब्लोटॉर्च सोडले, जेणेकरून हे एखादे तांत्रिक कृत्य असू शकते असे लोकांना वाटू शकते, असा त्यांचा त्यामागील हेतू होता. तसेच गोंधळ पसरवण्यासाठी, तपासाची दिशाभूल करण्यासाठी आणि संशय दुसऱ्या दिशेने वळवण्यासाठी ही एक रणनीती होती. पण पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सविस्तर तपास केला आणि लवकरच सत्य समोर आले.

अखेर पोलिसांनी या दरोड्यात वापरलेली दोन वाहने, 10.5 किलो सोन्याचे दागिने आणि वितळलेल्या दागिन्यांपासून बनवलेले सोन्याचे बिस्किटे जप्त केली आहेत. एवढेच नव्हे तर, गुन्हेगारांनी त्यांच्या वाहनांचा कोणताही मागमूस सापडू नये म्हणून फिल्मी स्टाइल अवलंबली आणि त्यांची दुचाकी वाहनं ही ट्रकमधून गुन्ह्याच्या ठिकाणी नेली. त्यांनी बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेतही छेडछाड केली – सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा बदलली, हाय मास्ट लाईटिंग केबल्स कापल्या आणि नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डर (एनव्हीआर) काढून घेतला. अशी त्यांची एकूणच जय्यत तयारी होती.

मात्र एवढं सगळं करूनही अखेर पोलिसांनी या दरोड्याचं रहस्य उलगडलंच. या हाय-प्रोफाइल प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आठ पथके तयार केली. एका संशयास्पद कारच्या हालचालींवरून पोलिसांना एक महत्त्वाचा सुगावा लागला. जेव्हा ती कार मिरियालाच्या नावावर असल्याचे आढळून आले आणि त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

या दरोड्यात आणखी लोकांचा सहभाग असू शकतो असा पोलिसांना संशय आहे. तसेच उर्वरित सोनं जप्त करण्यासाठी तपास सुरू आहे. परंतु ज्या पद्धतीने तपासात गोंधळ उडवण्यासाठी केशर आणि हळद यासारख्या प्रतीकात्मक घटकांचा वापर करण्यात आला त्यामुळे या दरोड्याला एका गूढ आणि धक्कादायक वळण मिळाले. अखेर ज्याचे सत्य बाहेर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow