दौंडचे माजी नगराध्यक्ष शेख याच्यावर गुन्हा ! जगताप, पडळकर, लांडगे यांच्याविषयी अपशब्द

आय मिरर
अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या कुटुंबातील महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यासह आमदार गोपीचंद पडळकर व महेश लांडगे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी दौंड नगरपालिकेचा माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याच्याविरुद्ध अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात शनिवारी 28 जून रोजी गुन्हा दाखल केला आहे.
अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात नीलेश बांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल केला आहे.
राज्यातील काही आमदार व भाजप पदाधिकारी मुस्लिम समाजाविषयी वादग्रस्त विधाने करीत असल्याने त्याचा निषेध करून कारवाईच्या मागणीसाठी दौंड पोलिस ठाण्यावर शुक्रवारी 27 जून रोजी मोर्चा काढला होता. यात सकल मुस्लिम समाजाच्या या मोर्चानंतर बोलताना माजी नगराध्यक्ष बादशाह शेख याने आक्षेपार्ह विधाने केली होती.
अहिल्यानगर मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप यांच्या कुटुंबातील महिलांविषयी अतिशय गलिच्छ विधान करीत आमदारांना झोडपण्याची धमकी शेख याने दिली होती. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील आमदार गोपीचंद कुंडलिक पडळकर व भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्याविषयी अपशब्द वापरून बादशहा शेख याने दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्याकरिता चिथावणीखोर भाषण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दौंड पोलिस ठाण्याबाहेर राज्यातील तीन आमदारांना झोडपण्याची धमकी दिल्यानंतरही दौंड पोलिसांनी बादशहा शेख याच्याविरोधात २८ जूनपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही.
बादशहा शेख याच्याविरुद्ध विनयभंग, हिंदू विवाहितेवर पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार करणाऱ्या वसीम बादशहा शेख या मुलाला गुन्ह्यात सहकार्य करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, दंगल करणे, आदी गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, अहिल्यानगर पोलिस दलाचे पथक शनिवारपासून दौंड व परिसरात फरार बादशहा शेख याचा शोध घेत आहेत.
What's Your Reaction?






