एक रकमी विजबिल भरण्याची जाचक अट रद्द करण्याची बहुजन मुक्ती पार्टीची मागणी

आय मिरर(देवा राखुंडे)
बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आज (दि. 16) रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या इंदापूर शाखेस विजबीलासंदर्भात निवेदन देण्यात आले. महावितरण कंपनीने एक रकमी विजबिल भरणा करण्याची जाचक अट रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
नोटबंदी आणि लाॅकडाऊनमुळे सर्व सामान्य जनतेचे अर्थकारण विस्कटले होते. त्यातच महागाईचा भस्मासुर आणि बेरोजगारीची वाढती दाहकता अशा या बिकट परिस्थितीतून सर्व सामान्य जनतेला बाहेर पडणे कठीण बनले असतानाच रोज नवीन समस्येला तोंड द्यावे लागत आहे. नुकतेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांना एक रकमी विजबिल भरण्याची जाचक अट टाकली आहे. यामुळे सर्व सामान्य जनतेसमोर मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. महावितरण च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना टप्प्याने विजबिल घेण्याची विनंती केली असता वरिष्ठ कार्यालयाकडूनच एक रकमी विजबिल भरणा करून घेण्याचे आदेश आले आहेत. तसेच एक रकमी विजबिल भरणा केला नाही तर विज कनेक्शन तोडण्याचे ही आदेश दिले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कर्मचारी वर्ग सुध्दा हतबल झाला आहे.
अशा परिस्थितीत सर्व सामान्य जनतेसाठी लढणाऱ्या बहुजन मुक्ती पार्टीने महावितरण च्या जाचक अटी रद्द करण्यात यावेत या मागणी चे निवेदन उपकार्यकारी अभियंता, इंदापूर यांना दिले आले. सदरच्या जाचक अटी रद्द करून विज ग्राहकांना सोयीस्कर अशा टप्प्यांमध्ये विजबिल भरणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली नाही तर बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने कठोर असे संघटनात्मक आंदोलन सुरू करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना वसिम शेख, सुरज धाईंजे, संतोष क्षीरसागर, नागेश भोसले, शेखर चव्हाण, विनोद शिंदे, सोहेल शेख, फैजान मुजावर, भैय्या परदेशी, राजू कांबळे, श्रेणिक साळुंखे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?






