गुरुवारी शिवकालीन ऐतिहासिक स्थळांवर सुनेत्रा पवार करणार हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी - प्रदीप गारटकर
आय मिरर
छत्रपती शिवजयंतीनिमित्त गुरुवार, दि. २८ मार्च रोजी किल्ले रायरेश्वर येथील मंदिरात सुराज्य संकल्प अंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघातील शिवकालीन गड किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार असून याची सुरवात इंदापूर शहरातील ऐतिहासिक अशा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवर पुष्पवृष्टी करुन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
गारटकर म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली त्याच रायरेश्वर किल्ल्यावरील मंदिरात सुनेत्रा अजित पवार या शिवजयंती निमित्त सुराज्याचा संकल्प करणार आहेत.शिवजयंतीचे औचित्य साधून सुनेत्रा अजित पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातील शिवकालीन गड किल्ले व ऐतिहासिक स्थळांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणार आहेत.
इंदापूर येथील छत्रपती शिवरायांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या गढीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करुन मोहिमेस सुरुवात होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे जन्मस्थळ किल्ले पुरंदर व पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सरदार मुरारबाजी देशपांडे यांचे समाधीस्थळ याठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येईल. पुढे रायरेश्वर किल्ल्यावरील मंदिरात अभिषेक करुन नागरीकांच्या उपस्थित सुराज्य संकल्प करण्यात येणार आहे. त्यानंतर राजगड येथील महाराणी सईबाई भोसले यांचे समाधीस्थळ, तोरणा किल्ला व सिंहगड येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळावर पुष्पवृष्टी करण्यात येईल.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आंबेगाव येथील गौरवशाली शिवसृष्टी येथे या मोहिमेचा समारोप होईल. त्यानंतर वारजे परिसरात बांधण्यात आलेल्या श्री. शिवाजी महाराज मंदिर येथे २ हजार महिलांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे.
What's Your Reaction?