श्री छत्रपती पाठोपाठ बारामतीच्या माळेगाव कारखान्याची ही निवडणूक जाहीर, पवार गटाच्या भूमिकेकडे लक्ष

आय मिरर
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. बुधवार दि. २१ मे ते २७ मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तर २२ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी प्रकाश अष्टेकर आणि माळेगावचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २१ ते २७ मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तसेच २८ मे रोजी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल.
२९ मे ते १२ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. १३ जून रोजी अंतिम उमेदवारी यादी जाहीर केली जाणार असून दि. २२ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. दि. २४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
या कारखान्यावर मागील अनेक दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व आहे. सध्या इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार इंदापूर तालुक्यात दौरे करत असताना आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा देखील निवडणूक लागल्याने या कारखान्याच्या निवडणुकीकडे देखील आता लक्ष लागणार आहे.
शरद पवार गटाच्या भूमिकेकडे लक्ष...
इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक 18 मे रोजी प्रत्यक्षात मतदान होणार आहे तर 19 मे रोजी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे नवे कारभारी ठरणार आहेत. इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती आणि बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व राहिलेले आहेत. इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माघार घेतलेली आहे याची घोषणा तालुकाध्यक्ष अडवोकेट तेजसिंह पाटील यांनी केली. सुरुवातीला खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या वतीने अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या श्री जय भवानी विकास पॅनल ला पक्षाच्या वतीने पाठिंबा जाहीर केला होता. मात्र जागा वाटपामध्ये शरद पवार गटाला स्थान न दिल्याने या निवडणुकीतून आम्ही माघार घेत असल्याची घोषणा तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील यांनी केली होती.आता श्री छत्रपती पाठोपाठ बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार l पक्षाची भूमिका काय राहते याकडे आतापासूनच लक्ष लागलं आहे.
What's Your Reaction?






