"झाडे लावा, झाडे जगवा" केवळ शब्दातून नव्हे तर कृतीतून साकार करणारं इंदापूरचं शाह ग्लोबल स्कूल
आय मिरर
झाडे लावा झाडे जगवा हे केवळ नावापुरतेच नाही तर या उक्तीप्रमाणे प्रत्यक्षात कृती करण्याचं काम इंदापूर मधील शाह ग्लोबल स्कूल ने केले आहे.आज मंगळवारी दि.१ जुलै रोजी शाह ग्लोबल स्कूल, इंदापूर येथे वन महोत्सव व डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने शाळेच्या आवारात व परिसरातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
प्रास्ताविक शाह ग्लोबल स्कूलचे विश्वस्त मुकुंद शाह यांनी केले. या कार्यक्रमासाठी कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भारत शहा यांचीही उपस्थिती होती.
डॉ. क्षितिजा शाह यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे व पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगत महत्वपूर्ण मार्गदर्शन करताना पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची झाडे लावली आणि आपल्या परिसरातील झाडांची निगा राखण्याची शपथ घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण झाली आणि वृक्षारोपणाचे महत्त्व समजले. शाळेच्या परिसरात झालेल्या वृक्षारोपणामुळे वातावरण अधिक सुंदर व आल्हाददायक झाले आहे.
या कार्यक्रमात विद्यार्थी सोहम होळकुंदे याने वन महोत्सवाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. नंदिनी रणदिवे आणि स्वराली शेंडे यांनी वन विषयक सुंदर कविता सादर केल्या.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.संजय शाह, डॉ.चिंतामण पाटील, डॉ.यतीन शिंदे, श्री. मुकुंद शहा, श्रीमती प्रतिमा शहा व डॉ.सचिन बिचकुले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शिक्षिका रितू शुक्ला आणि कार्तिकी पाटील यांनी केले.हा कार्यक्रम शाह ग्लोबल स्कूलचे विश्वस्त श्री. अंगद शाह आणि श्रीमती रुचिरा शाह यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
तसेच, १ जुलै ते ७ जुलै दरम्यान शाळेमध्ये वन महोत्सव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या काळात प्रत्येक वर्गाकडून झाडांचे/वनांचे आपल्या जीवनातील महत्त्व पटवून देणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल.
What's Your Reaction?