मोठी बातमी | प्रवीण मानेंचा उद्या भाजप मध्ये प्रवेश ! ऑगस्टमध्ये इंदापुरात फडणवीसांच्या उपस्थितीत मेळावा...

Jul 1, 2025 - 13:56
 0  431
मोठी बातमी | प्रवीण मानेंचा उद्या भाजप मध्ये प्रवेश ! ऑगस्टमध्ये इंदापुरात फडणवीसांच्या उपस्थितीत मेळावा...

आय मिरर 

2024 च्या इंदापूर विधानसभेमध्ये दोन्ही पवारांच्या विरोधात भूमिका घेतलेले आणि परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून इंदापूर विधानसभेची खिंड अपक्ष लढवणारे सोनाई उद्योगसमूहाचे संचालक युवा नेते प्रवीण माने उद्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.

मुंबईमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात प्रवीण माने आणि इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांचा पक्षप्रवेश होणार असून भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती स्वतः प्रवीण माने आणि मयूरसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजपाचे जुन्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी पक्ष घराघरात पोहचवला आहे,त्यांच्यासोबत आम्ही काम करणार आहे आणि पक्ष घराघरात पोहचवण्याचे काम करणार आहे.

केंद्र राज्य सरकारच्या योजना तालुक्याच्या विकासासाठी कशा आणता येतील यासाठी आम्ही काम करणार आहोत. मंत्रिमंडळातील मुख्य खाती भाजपकडे आहेत.त्याचा फायदा तालुक्यातील अडचणी सोडवण्यासाठी होणार असल्याचा दावाही प्रवीण माने यांनी केला आहे.

20 वर्षापासून इंदापूरच्या राजकारणात समाजकारणात...

20 वर्षापासून इंदापूर तालुक्यात राजकारणात समाजकारणात काम करत आहे.या काळात अनेक चांगले सहकारी जोडत गेलो.माझे वडील आणि सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने यांनी जिल्हा परिषद वर काम केले. 2017 मी देखील जिल्हा परिषदेवर निवडून गेलो, सर्वांचे आशीर्वादाने मी पुणे जिल्हा बांधकाम समितीचा सभापती झालो. त्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात हजारो कोटी रुपयाची कामे आणू शकलो असेही प्रवीण माने यांनी म्हटलं आहे.

अवघ्या 21 ते 22 दिवसांत निवडणुकीला सामोरे गेलो...

2024 च्या विधानसभा निवडणुकीत काहीही केलं तर उभारायचं हा कार्यकर्त्यांचा आग्रह होता त्यामुळे मला तो डावलता आला नाही.मी अपक्ष म्हणून लढलो आणि अवघ्या 21 ते 22 दिवसांत निवडणुकीला सामोरे गेलो. अशा स्थितीतही लोकांनी 40 हजार मते आम्हाला दिली. राजकारणाचा जय पराजय असतो जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य केला.

फडणवीसांसोबत सोबत अनेक भेटी...

पण एवढ्या वरतीच थांबायचं नव्हतं निवडणुकीनंतर लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्हाला शासकीय पातळीवर अडचणी येऊ लागल्या. या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,चंद्रशेखर बावनकुळे,आमदार राहुल कुल यांच्याशी चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस मी अनेक वेळा भेटलो.त्या भेटीत मुख्यमंत्री फडणवीसांनी आम्हाला मुख्य प्रवाहाबरोबर या असे सांगितले. त्यामुळे मी कार्यकर्त्यांच्या रेट्यापुढे आणि इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट झाल्यानंतर आणि त्यांनी दिलेल्या मुख्य प्रवाहात येण्याचा प्रस्ताव यावर विचार करण्यासाठी दोन तीन दिवसाचा वेळ घेतला होता. या सर्व गोष्टींवर कार्यकर्त्यांशी चर्चा केली,कार्यकर्त्यांनी होकार दिला. त्यानंतर भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.उद्या मुंबईतील भाजपच्या पक्ष कार्यालयात आमचा भाजपात प्रवेश होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली गतिमान भारत पुढे चालत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य पुढे चालले आहे. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला भाजपात सामाविष्ट करून घेतल्या बद्दल त्यांचे आभार मानतो या कामी दौंड चे आमदार राहुल कुल त्यांची मोठी साथ लाभली. 

शरद पवार हे देशाचे नेते...

दरम्यान यापूर्वी माने कुटुंबाने राजकारणात पवार कुटुंबापासून फारकत घेतल्यानंतर आजही आमचे शरद पवार दैवत आहेत असा दावा केला होता यास अनुसरून प्रसार माध्यमांनी माने यांना शरद पवार तुमचे आता दैवत आहेत का ? असा प्रतिसाद केला यावर माने म्हणाले कीशरद पवार यांनी महाराष्ट्राचे देशाचे नेतृत्व केलेला आहे त्यांचं काम महाराष्ट्राला माहिती आहे.राजकारण वेगळं आणि कौटुंबिक संबंध वेगळे.

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील म्हणाले की, भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या आम्ही मुंबई पक्षप्रवेश करत आहोत. लवकरच इंदापूर तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा घेणार आहोत.यावेळी विविध विकास कामाचे उद्घाटन घेणार आहोत.अमित शाह यांची सभा इंदापुरात व्हावी असा आमचा आग्रह राहणार आहे.

उद्याच्या पक्षप्रवेशावेळी परिवर्तन विकास आघाडी सोबत असणारे जवळपास 35 पदाधिकारी पक्ष प्रवेश करणार आहोत. ऑगस्ट महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिला आहे त्यानुसार इंदापुरात जाहीर मेळावा घेणार आहोत.त्यात राहिलेले कार्यकर्ते पक्ष प्रवेश करतील.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow