बारामतीत खूनप्रकरणी बारा जणांना जन्मठेप,बारामती न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

आय मिरर
बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आज खून खटल्यात ऐतिहासिक निकाल देत चार सख्खे भाऊ, तीन महिलांसह बारा जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
दौंड येथील विनोद नरवार यांची 3 मे 2018 रोजी हत्या झाली होती. विनोद नरवाल त्यांच्या दुचाकीवरुन निघाले असताना अनोळखी लोकांनी तलवार, कोयता, लोखंडी पाईप, काठया, फरशीचे तुकडे, दगडांनी त्यांना बेदम मारहाण केली. फिर्यादी व विनोद नरवाल यांच्या पत्नी मीना नरवाल यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र दवाखान्यात नेताना त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दौड पोलिसात बारा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती एस.आर. पाटील यांच्या समोर हा खटला चालला. सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील अँड. प्रसन्न जोशी यांनी काम पाहिले. आठ साक्षीदारांची साक्ष या खटल्यात महत्वाची ठरली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पुरावे व न्याय वैद्यकीय पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने बारा जणांना जन्मठेप व पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
या दंडाची पाच लाखांची रक्कम मीना नरवाल यांना देण्याचेही आदेश न्यायालयाने दिलेले आहेत.
What's Your Reaction?






