धक्कादायक ! भुकेने तडफडून तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू
आय मिरर
छत्तीसगडच्या मुंगेली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तिथे एका महिला सरपंचाने पतीशी झालेल्या वादामुळे स्वतःच्या तीन वर्षांच्या मुलीला घनदाट जंगलात सोडलं होतं. त्या मुलीचा अन्न व पाणी न मिळाल्यानं मृत्यू झाला.मुंगेली जिल्ह्याच्या लोरमी पोलीस स्टेशन हद्दीतल्या खुडिया चौकीतल्या पटपरहा इथे ही घटना घडली.
महिला सरपंच संगीता पंद्रम यांचा पती शिवराम पंद्रम यांच्याशी 6 मे 2024 रोजी काही कारणावरून वाद झाला होता. घरगुती वादानंतर रागाने संगीता त्यांची तीन वर्षांची मुलगी अनुष्का आणि एका वर्षाच्या मुलाला घेऊन माहेरी जाण्यासाठी निघाल्या. मध्य प्रदेशच्या दिंडोरी जिल्ह्यात गोपालपूरमध्ये संगीता यांचं माहेर आहे. हे अंतर त्यांच्या सासरच्या घरापासून 25 किलोमीटर असून, हा भाग मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेला लागून आहे.
याबाबत पोलीस अधिकारी माधुरी धिराही यांनी सांगितलं की, 'दोन मुलांसह माहेरी गेलेली महिला सरपंच रात्रीच्या वेळी तिच्या मुलीला गावापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मैलू टेकडीच्या माथ्यावर सोडून परतली. महिलेनं हा प्रकार तिच्या सासरी शेजारी राहणाऱ्या लोकांना सांगितला. त्यानंतर शेजाऱ्यांनी शिवराम यांना याबाबत माहिती दिली. शिवराम यांनी तत्काळ साथीदारांसह जंगलात जाऊन मुलीचा शोध सुरू केला. परंतु मुलगी न सापडल्यानं शिवराम यांनी खुडिया चौकी गाठून पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर खुडिया पोलिसांनीही मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मुलगी हरवल्याची नोंद घेऊन पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी विविध पथकं तैनात केली. अखेर 9 मे 2024 रोजी मुलीचा मृतदेह टेकडीच्या माथ्यावर सापडला.
मुलीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालामध्ये मुलीच्या शरीरावर वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे बालिकेचा मृत्यू हा अन्न व पाणी न मिळाल्यानं झाल्याच समोर आलं आहे.
दरम्यान, या घटनेनं संपूर्ण मुंगेली जिल्हा हादरला आहे. पतीशी वाद झाल्यामुळे महिला सरपंचाने मुलीला जंगलात सोडलं होतं. त्यामुळे पती-पत्नीच्या वादात निष्पाप मुलीचा बळी गेल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मुलीच्या मृत्यूसाठी कारणीभूत असणाऱ्या संबंधित महिला सरपंचावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातल्या नागरिकांकडून होतआहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
What's Your Reaction?