गळ्यावरचा घाव बोटांवर गेला,इंदापुरात दुचाकीस्वार थोडक्यात बचावला ! चायनीज मांजा विक्रेत्यांवर कारवाई कधी ?

आय मिरर
इंदापूर शहरातील जुन्या पुणे सोलापूर महामार्गावर टेंभुर्णी नाक्यापासून काही अंतरावरील स्मशानभूमी समोर मंगळवारी दि.08 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता च्या सुमारास चायनीज नायलॉन मांजा हाताला कापल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गळ्यावरचा घाव हाताच्या बोटांवर गेल्यामुळे दुचाकी चालक थोडक्यात बचावला.
इंदापूर मधील शिवाजी शेळवणे हे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक चायनीज नायलॉन मांजा त्यांच्या हाताला कापला गेला, त्यानंतर तो मांजा गळ्याला देखील घासला गेला मात्र दुचाकीचा वेग कमी होता.त्यामुळे सुदैवाने त्यांच्या गळ्याला फार मोठी इजा झाली नाही अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
नागपंचमीचा सण जवळ आला असून त्या अनुषंगाने बाजारात आता चायनीज नायलॉन मांज्यांची विक्री देखील सुरू झाली असल्याचं या दुर्घटनेतून समोर येत आहे.त्यामुळे इंदापूर नगर परिषदेने तात्काळ इंदापूर शहरातील अशा चायनीज नायलॉन मांजा विक्रेत्यांवर धाडी टाकून कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी इंदापूर शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.
या पाठीमागे देखील बंदी असलेल्या चायनीज नायलॉन मांजा च्या माध्यमातून अनेक मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत. इंदापूर नगर परिषदेने यापूर्वी देखील चायनीज अगर नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाया केल्या आहेत. मात्र तरी देखील बंदी असलेल्या चायनीज मांजा विक्रीचे सत्र थांबताना दिसत नाही.
जर इंदापूर शहरातून चायनीज नायलॉन मांजा हद्दपार करायचा असेल तर नगर परिषदेने तात्काळ कठोर भूमिका घेत धाडसत्र मोहीम राबवून जे व्यापारी बंदी असलेला चायनीज मांजा विक्री करताना आढळतील किंवा कोण नागरिक असा चायनीज मांजाचा वापर करताना दिसून येतील त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी देखील आता नागरिकांमधून होत आहे.
काय आहे नायलॉन मांजा?
पतंग उडविण्यासाठी अधिकतर नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे. हा मांजा प्लास्टिक आणि धातूच्या मिश्रणापासून तयार केला जातो. नायलॉन किंवा चायनीज मांजा सर्वसाधारण मांजाच्या तुलनेत धारदार असतो. हा मांजा सहजपणे तुटूही शकत नाही. याच कारणास्तव या मांजात अडकल्यानंतर अनेक पक्षी आणि माणसांचा मृत्यू झाला आहे. त्यावर प्रतिबंध लावण्यात आले,मात्र तरीही त्याचा सर्रास वापर होताना दिसतो.
चायनीज किंवा नायलॉन मांजा कसा होतो तयार?
या माजांमध्ये नायलॉन, मॅटेलिक पावडर, अॅल्युमिनियम ऑक्साइड आणि लेडचा समावेश असतो. यानंतर या मांजावर काच किंवा लोखंड्याच्या चुऱ्याने धार केली जाते. ज्यामुळेच हा मांजा अधिक घातक होतो. हा मांजा प्लास्टिकप्रमाणे दिसतो आणि ताणलाही जातो. मात्र हा मांजा खेचला तर तुटण्याऐवजी अधिक मोठा होतो. हा मांजा वापरून पतंग उडविताना यात एक कंपन तयार होतो.
भारतात नायलॉन मांजावर बंदी...
नायलॉन मांजावर सरकारने बंदी घातली आहे. त्याची खरेदी आणि विक्री करणाऱ्यांना पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 15 अंतर्गत 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार 6 महिन्यांपर्यंतची शिक्षा किंवा दंड होऊ शकतो. प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा 1960, कलम 11 अंतर्गत 50 हजारांपर्यंत दंड किंवा 6 वर्षांची शिक्षा होऊ शकते. या मांजाचा वापर करताना आढळल्यास तातडीने अटक केलं जाऊ शकतं.
What's Your Reaction?






