मुख्यमंत्र्यांनी कानात काय सांगितलं ते आत्ताच सांगणार नाही पण ऑगस्टमधील मेळाव्यात बोलणार : प्रवीण मानेंच्या वक्तव्याने इंदापूरच्या राजकारणात उडाली खळबळ

Jul 7, 2025 - 20:29
Jul 7, 2025 - 20:41
 0  991
मुख्यमंत्र्यांनी कानात काय सांगितलं ते आत्ताच सांगणार नाही पण ऑगस्टमधील मेळाव्यात बोलणार : प्रवीण मानेंच्या वक्तव्याने इंदापूरच्या राजकारणात उडाली खळबळ

आय मिरर 

आगामी काळात इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व निवडणुका ताकदीने लढणार आणि जिंकणार असल्याचा निर्धार पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आरोग्य सभापती आणि भारतीय जनता पार्टीचे युवा नेते प्रवीण माने यांनी व्यक्त केला आहे.

इंदापूर तालुक्यात आता 35 हजार भाजपा सभासदांची नोंदणी झाली आहे. पुढे देखील ही नोंदणी वाढवली जाईल. इंदापूर मध्ये ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा घेणार आहोत. ज्यावेळी माझा पक्ष प्रवेश झाला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी भेटी वेळी माझ्या कानात काय सांगितले हे मी आत्ताच सांगणार नाही मात्र त्यांची परवानगी घेऊन शेतकरी मेळाव्यात ते मी जाहीर करेल असं माने यांनी म्हटलं आहे.

प्रवीण माने यांच्या या वक्तव्यामुळे इंदापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण माने यांना नेमका कोणता कानमंत्र दिला आहे आणि प्रवीण माने ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या शेतकरी मेळाव्या मध्ये हे सर्वांसमोर जाहीर करणार का ? याची उत्सुकता आता इंदापूर वासियांना लागली आहे.

पुण्याच्या इंदापुरात सोमवारी सात जुलै रोजी भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला आहे. पक्ष वाढ विस्तार आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा पार पडला. या मेळाव्याला भाजपचे युवा नेते प्रवीण माने, मयूरसिंह पाटील यांसह अनेक भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

माने पुढे म्हणाले की,इंदापूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी मी भाजपात प्रवेश केला.कार्यकर्त्यांचा त्यासाठी आग्रह होता.मुख्यमंत्री यांनी आम्हाला तुम्ही योग्य ट्रॅक वरती आला आहात असे सांगत तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवू असे आश्वास्त केले आहे.इंदापूर तालुक्यात उद्योग धंदे कसे आणता येतील त्यासाठी आगामी काळात काम करणार आहे.

इंदापूर तालुक्यात विद्युत रोहित्राचे प्रश्न आहेत.त्यासाठी येणाऱ्या काळात आम्ही काम करू.तालुक्यातील रस्त्याचे काही प्रश्न प्रलंबित आहेत, जाणीवपूर्वक ते प्रलंबित ठेवले आहेत.यासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. राज्य सरकारने रस्त्यांबाबत चांगले निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांना ते लाभदायक झाले आहेत.

2024 ला इथल्या नेत्याने अचानक पक्ष बदलला पण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जीवाच रान करून पक्ष टिकवला.प्रवीण माने यांच्या प्रवेशाने खूप मोठी ताकद निर्माण झाली आहे.विधानसभेला लोकसभेला आम्हाला याचा फायदा मिळणार आहे.बूथ जितो चुनाव जितो प्रमाणे आम्ही काम करणार आहोत.जुना नवा भेदभाव आम्ही इथेच सोडून दिला.पक्ष आणि शासनाच्या योजना तळागाळात पोहचवण्याचे काम केलं जाईल.आम्ही एकजुटीने एकसंधपणे लढू,प्रत्येक निवडणुक्तीत आमचा उमेदवार इंदापुरात उभा असेल तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ते वरिष्ठांपर्यंत पोचवले जातील. असं आश्वासन यावेळी भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी दिले.

आमची ताकद वाढवणं आमची जबाबदारी...

आमची ताकद वाढवणे आमची जबाबदारी आहे, 2029 पर्यंत युती टिकेल की नाही हे त्यावेळी ठरवू पण युती आहे म्हणून आम्ही तयारी करायची नाही असं कुठे आहे. पक्ष वाढवणे आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत पक्ष पोहोचवणे ही आमची जबाबदारी आहे. 

शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार संवेदनशील आहे. 2014 पासून शेतकरी हिताची निर्णय या सरकारने केले आहेत.कर्जमाफी च्या बाबतीत सरकार योग्य निर्णय घेईल.पक्ष सांगेल त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत निर्णय घेतले जातील असंही वढणे यांनी सांगितलं.

कारखान्याच्या अध्यक्षांच्या मुंबई दिल्लीच्या वाऱ्या...

भाजप शिवाय आमच्यापुढे पर्याय नव्हता,भाजप हा जगातील सर्वाधिक मोठा पक्ष आहे.कारखान्याची थकलेली ऊस बिले हा इंदापूर तालुक्यातील गंभीर प्रश्न आहेत.कर्मयोगी कारखान्याचे चेअरमन मुंबई दिल्ली च्या वाऱ्या करत आहेत.इंदापूरचे लोकप्रतिनिधी या शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत गंभीर नाहीत.अनेकांची ऊस बिले थकली आहेत,नीरा भीमा आणि कर्मयोगी साखर कारखान्याची बिले थकली आहेत.कर्मयोगी कारखान्याचे चेअरमन यांनी इंदापुरात यावं आणि कर्मयोगी कारखाना चालू होणार आहे की नाही याची घोषणा करावी. अशी भूमिका इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि इंदापूरचे भाजपचे नेते मयूरसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

मयूरसिंह पाटील म्हणाले की,थकलेल्या शेतकऱ्यांना ऊस बिले वेळेवर नाही मिळाली तर भाजपच्या वतीने एक जनआंदोलन उभे केले जाईल.सध्या पावसाने मोठा ताण दिला आहे दुसरीकडे शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाची बिले मिळाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांपुढे समस्यांचा डोंगर आहे.मुख्यमंत्री सहकार मंत्री यांना भेटून आम्ही निवेदन देणार आहोत,इंदापुरातील परिस्थिती मांडणार आहोत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow