मी तुझी बहीण आहे म्हणतं ती ओरडत होती पण त्याने...तब्बल १० वर्षांनी झाली कठोर शिक्षा

Jul 13, 2025 - 16:02
Jul 13, 2025 - 16:03
 0  804
मी तुझी बहीण आहे म्हणतं ती ओरडत होती पण त्याने...तब्बल १० वर्षांनी झाली कठोर शिक्षा

आय मिरर 

कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने एका धक्कादायक प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आपल्या १५ वर्षांच्या अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सख्ख्या भावाला कल्याण जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

याप्रकरणी त्याला दहा वर्षांची सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश पी. आर. अष्टुरकर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. विशेष म्हणजे पीडित बहिणीने न्यायालयात दिलेल्या धाडसी साक्षीतूनच आरोपीला शिक्षा मिळणे शक्य झाले.

नेमकं प्रकरण काय?

ही गंभीर घटना २०१५ साली डोंबिवली येथे घडली होती. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांदरम्यान आरोपी भावाने पीडितेवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी त्याचे वय २२ वर्ष होते. आता तो ३२ वर्षांचा आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये पीडित मुलगी घरी एकटी असताना तिचा भाऊ रात्री 10.30 च्या सुमारास तिच्या घरी आला.

मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्याने पीडितेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. आरोपीने पीडितेला याबद्दल कोणालाही न सांगण्याची धमकी दिली, ज्यामुळे ती प्रचंड घाबरली.

या घटनेनंतर पुन्हा सप्टेंबर महिन्यात पीडिता घरात एकटी असताना हाच भाऊ तिच्या घरी आला. त्याने पुन्हा एकदा तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. पीडितेने त्याला मी तुझी बहीण आहे असे सांगून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पीडिता जोरजोरात ओरडू लागताच, आरोपीने टीव्हीचा आवाज वाढवला. पीडितेने मोठ्या बहिणीला सांगण्याची धमकी दिल्यावरही तो गप्प राहिला नाही. पीडितेचा तीव्र प्रतिकार पाहून, आरोपीने स्वयंपाकघरातून चाकू आणून तो तिच्या पोटाला लावला. यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. या झटापटीत पीडितेच्या पोटाला जखमही झाली होती.

पोलिसात तक्रार दाखल

भावाच्या या सततच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडितेने अखेर आपला मित्र आणि वडिलांना हा प्रकार सांगितला. मित्र आणि वडिलांनी तिला धीर दिला. तसेच न घाबरता पोलिसात तक्रार करण्याचा सल्लाही दिला. यानंतर त्या पीडितेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्परतेने तपास करून आरोपीला अटक केली.

तब्बल १० वर्षांनी कठोर शिक्षा

यानंतर आता तब्बल १० वर्षांनी कल्याण न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. कदंबिनी खंडागळे यांनी पीडित मुलीची बाजू मांडली. तर आरोपीतर्फे अॅड. रश्मी भांडारकर यांनी प्रतिवाद केला. आरोपीच्या वतीने जोरदार प्रतिवाद करण्यात आला असला तरी, न्यायालयाने उपलब्ध असलेले ठोस पुरावे आणि विशेषतः पीडित बहिणीची साक्ष ग्राह्य धरली. प्रतिवादाचे सर्व दावे फेटाळून लावत न्यायालयाने आरोपीला दहा वर्षांची सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने ठोठावलेला दंड पीडितेला देण्याचे आदेश दिले आहेत. याव्यतिरिक्त, शासनाच्या ‘मनोधैर्य’सारख्या पीडित-केंद्री योजनांचा लाभ पीडितेला मिळवून देण्याची सूचना न्यायालयाने विधी व सेवा प्राधिकरणाला केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow