महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप, संजय राऊतांचा मोठा दावा

आय मिरर
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मराठी एकजुटीचे जोरदार वारे वाहत असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने निर्माण झालेल्या या लाटेने सत्ताधाऱ्यांमध्ये धाकधूक वाढवली आहे.
५ जुलै रोजी मराठी विजय सोहळ्यात दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर लोकांनी ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा केला, ज्यामुळे मराठीवरील अन्याय सहन न करण्याचा आणि त्यासाठी एकजुटीने लढण्याचा आत्मविश्वास मराठी लोकांमध्ये निर्माण झाला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’मधील ‘रोखठोक’ सदरातून या एकजुटीचे महत्त्व, त्याचे राजकीय पडसाद आणि सरकारची अस्वस्थता यावर सविस्तर भाष्य केले आहे.
राजकीय युती अद्याप जाहीर नाही
“दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे मराठी लोकांमध्ये हा आत्मविश्वास निर्माण झाला असला तरी, महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे सर्व प्रश्न लगेच मार्गी लागले असे नाही. हिंदी सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे एकत्र आले, पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाही. ही युती होणे गरजेचे आहे, तरच महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मराठी एकजुटीचे वादळ निर्माण झाले आहे, ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हादरले आहेत. ही युती घडू नये यासाठी ते प्रयत्न करतील”, असा दावा संजय राऊत यांनी रोखठोकमधून केला आहे.
“मराठी एकजुटीच्या विजय मेळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला विजेचे जोरदार धक्के बसले आहेत. याचे रूपांतर भूकंपाच्या जोरदार धक्क्यात होईल आणि आपले राज्य पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल याची भीती एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरच्या लोकांना वाटत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. याच चिंतेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठून अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे.
“महाराष्ट्रामध्ये सध्या जे घडते आहे ते थांबवा. फडणवीस यांना हे वादळ रोखता येणार नाही,” असे शिंदे यांनी शहांना सांगितल्याचे राऊत यांनी ‘रोखठोक’मध्ये नमूद केले आहे. यावर शहांनी “काय करायचे?” असे विचारल्यावर, “मी माझ्या लोकांसह भाजपमध्ये येतो, मला मुख्यमंत्री करा. हे सर्व रोखण्याची गॅरंटी देतो,” अशी चर्चा शिंदे-शहा यांच्यात झाल्याचे शिंदे गटात बोलले जात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.
फडणवीसांनी जरांगेंचे मराठा आंदोलन पद्धतशीर संपवले
शिंदे गटाचे उदय सामंत, शिरसाट अशा प्रकारचे मंत्री विधानसभेत उघडपणे बोलत होते की, “शहा व शिंदे मिळून मराठी माणसांची एकजूट फोडतील. राज व उद्धव यांना एकत्र येऊ देणार नाहीत.” शिंदे यांचे मंत्री ही विधाने कशाच्या बळावर करतात, असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. राज ठाकरे यांची भूमिका मराठीबाबत एकदम योग्य, पण उद्धव ठाकरे यांच्या त्याच भूमिकेवर दोघांनी टीका केली, ही टीका सुरूच आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यातून निर्माण झालेली ही पोटदुखी सरळ दिसत असल्याचे संजय राऊत म्हणाले. “एक कार्यक्रम, एक मंच. दोन भाऊ एकत्र आले, त्यात एक बरा व दुसरा चुकीचा असे बोलणारे स्वतःच्याच अब्रूचे धिंडवडे त्या दिवशी काढत होते,” असेही राऊतांनी म्हटले.
“फडणवीस यांचे बोलणे वकिली पद्धतीचे असते आणि न्यायमूर्ती खिशात व दबावाखाली असल्यामुळेच यांची वकिली सध्या चालली आहे. कधीकाळी हेच फडणवीस ‘विदर्भ हेच माझे राज्य’ असे फलक घेऊन नागपुरात आंदोलन करत होते हे लोक विसरलेले नाहीत. मराठी माणूस, मराठी एकजूट हा देखावा त्यांनी ते आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत म्हणून उभा केला आहे. फडणवीस यांनी मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा आंदोलन पद्धतशीर संपवले आणि छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेऊन ओबीसींनाही थंड केले. याच काव्याने हे महाशय मराठी एकजुटीलाही खिंडार पाडतील असे त्यांचेच लोक उघडपणे बोलू लागले आहेत”, असे संजय राऊत यांनी ‘रोखठोक’मध्ये म्हटले आहे.
राज ठाकरेच संभ्रम दूर करतील हे नक्की
“शिंदे आणि फडणवीस राज ठाकरे यांच्या निवासस्थानी चहापानासाठी जातात आणि राज ठाकरे त्यांचे स्वागत करतात. शिंदे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान औटघटकेच्या फौजदारासारखे आहे. फडणवीस हे राज ठाकरे यांना भेटून राजकीय हवा गरम करतात. शिंदे यांचीच हवा सध्या संपल्याने त्यांच्या भेटीगाठी फुसक्या आहेत आणि या दोघांमुळे सध्याची मराठी एकजूट संपेल असे वाटत नाही. एक दिवस स्वतः राज ठाकरेच समोर येऊन या सगळ्यांवर बोलतील आणि संभ्रम दूर करतील हे नक्की”, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
What's Your Reaction?






