इंदापूरात अजित पवारांनी घेतली शहा बंधुंची भेट ; पवारांच्या भेटीने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या 

Feb 26, 2024 - 22:56
 0  1833
इंदापूरात अजित पवारांनी घेतली शहा बंधुंची भेट ; पवारांच्या भेटीने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या 

आय मिरर(देवा राखुंडे)

पूर्वी हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले व मागील तीन-चार वर्षापासून कोणतेही राजकीय पक्षात सक्रिय न होता सामाजिक उपक्रमातून तालुक्यात नावलौकिक कमावलेला इंदापूरच्या शहा परिवाराची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवार (ता.25) भेट घेतली.या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.

यावेळी विशेष बाब म्हणजे इंदापूर शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष असलेल्या भरत शहा यांनी शहराच्या व्यापारवाढीसाठी मागणी केलेल्या भीमा नदीवर पुलाच्या कामाची घोषणा पवार यांनी केल्याने व्यापारी बांधवांमधून आनंद व्यक्त होत आहे.   

शहा परिवाराच्या निवासस्थानी इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा,शहा परिवाराचे सर्वेसर्वा मुकुंद शहा तसेच कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा,युवा उद्योजक अंगद शहा,यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 यावेळी माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर,व्यापारी संघाचे कार्याध्यक्ष नंदकुमार गुजर,मेघशाम पाटील, संदीप वाशिंबेकर, संजय दोशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.      

यावेळी व्यापारी संघाच्या वतीने अध्यक्ष भरत शहा यांनी विविध मागण्यांचे लेखी निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.यामध्ये इंदापूर शहर व परिसरातील व्यापारी बांधवांच्या महत्वाच्या चार मागण्या करण्यात आलेले आहे. इंदापूर शहर हे जरी तालुक्याचे ठिकाण असले तरी देखील ग्रामीण भागाच्या जीवावर येथील बाजारपेठ अवलंबून आहे.भीमा नदीच्या काठावर असलेली खेडी या इंदापूर शहराला भीमानदीवरील पूल उभारून जोडता येईल व तब्बल तीन जिल्हे इंदापूरला जोडले जातील दळणवळण वाढेल.अशी माहिती देत अध्यक्ष भरत शहा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले.      

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही क्षणाचा विलंब न लावता संबंधित विभागाला याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या व येत्या तीन-चार महिन्यात या कामासाठी शासकीय निधी दिला जाईल.असा शब्दच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यामुळे आगामी काळात इंदापूर शहर ही पश्चिम महाराष्ट्राची मोठी बाजारपेठ निर्माण होणार आहे.यामुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow