इंदापूर अर्बन बँक दहा टक्के लाभांश देणार - हर्षवर्धन पाटील ; बँकेच्या नवीन शाखा लवकरचं
आय मिरर
इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक सभासदांना दहा टक्के लाभांश देणार आहे, त्यासाठी रिझर्व बँकेकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. तसेच आगामी काळात बँकेच्या नवीन शाखा उघडण्यात येणार आहेत. बँकेच्या ठेवी 175 कोटी रुपयांपर्यंत झाल्या असून त्यात वाढ होत आहे, अशी माहिती बँकेचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे रविवारी (दि. 24) रोजी दिली.
इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या सभागृहामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सदर प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव यांनी भाषणात बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे, राजवर्धन पाटील, अँड. शरद जामदार, नानासाहेब शेंडे यांचा सत्कार करण्यात आला.
हर्षवर्धन पाटील भाषणात पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यातील युवकांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी कर्ज उपलब्ध व्हावे,या उद्देशाने बँकेची कर्मयोगी शंकररावजी पाटील, राजेंद्रकुमार घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापना करण्यात आली. त्यानंतर बँकेच्या माध्यमातून हजारो कुटुंबे उभी राहिली आहेत. बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के असून, ग्रॉस एनपीए आगामी काळात शून्यावर आणण्याचा प्रयत्न आहे. आगामी काळात संचालक मंडळाने कर्ज वसुलीसाठी पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. सर्वांचे प्रयत्न व सहकार्यामुळे आज बँकेला चांगले दिवस आले आहेत. भविष्यात राज्यातील सर्व सहकारी संस्था ह्या व्यावसायिक दृष्टिकोनातून चालविल्या तरच त्या तग धरतील अशी परिस्थिती आहे. बँकेच्या संचालक मंडळामध्ये 3 डॉक्टर, उद्योजक, वकील, व्यावसायिक, शिक्षण क्षेत्रात काम करणारे तसेच प्रगतशील शेतकरी, युवक यांचा समावेश करून, बँकेला चांगला चेहरा देण्याचे काम करण्यात आले आहे. येत्या पाच वर्षात बँकेच्या ठेवी रु.500 कोटी पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवावे. इंदापूर अर्बन बँक ही तालुक्यातील जनतेच्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य घटक झाली आहे, असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
सभेचे अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एस. तावरे यांनी केले. यावेळी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बँकेचे संचालक मंडळ, सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर तर आभार उपाध्यक्ष सत्यशील पाटील यांनी मानले.
What's Your Reaction?