शिवसेनेचे सुदर्शन रणवरे उद्या शुक्रवारी का करणार नीरा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन ; वाचा सविस्तर
आय मिरर
इंदापूर व माळशिरस तालुक्याला जोडलेल्या नीरा नदीवरील 'निमसाखर - पळसमंडळ' बंधाऱ्याची दुरुस्ती व बंधाऱ्याचा रस्ता तयार करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इंदापूर तालुका संघटक सुदर्शन रणवरे यांनी शुक्रवारी (दि.२७) निरा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सुदर्शन रणवरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंदापूर आणि माळशिरस तालुक्याच्या हद्दीवरील इंदापूर तालुक्यातील निमसाखर वीर वस्तीवरून व नदीपलीकडे माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ यांना जोडणाऱ्या नीरा नदीवरील बंधाऱ्याच्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार वर्ग अशा नागरिकांची वर्दळ होत असते. पावसाळ्यात या रस्त्यावर होत असलेल्या चिखलामुळे अनेक दिवस वाहतूक पूर्णपणे बंद असते.
शुक्रवारी सकाळी ११-०० वाजता निमसाखर - पळसमंडळ बंधाऱ्यावर नीरा नदीपात्रात होणाऱ्या जलसमाधी आंदोलनास निमसाखर व पळसमंडळ भागातील सर्व नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व शेतकऱ्यांनी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन रणवरे यांनी केले आहे.
रणवरे यांनी याबाबतचे निवेदन जलसंधारण विभाग, निमगाव केतकी व सार्वजनिक बांधकाम उपविभाग भिगवण यांना दिले आहे.
What's Your Reaction?