काकांच्या हातातून घड्याळ निसटलं ! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित दादांकडे

Feb 6, 2024 - 21:21
 0  342
काकांच्या हातातून घड्याळ निसटलं ! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित दादांकडे

आय मिरर

महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निकाल दिला आहे.

अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? यावर सुनावणी पार पडली होती. अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून सुनावणीवेळी जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणूक झाली नसल्याचा युक्तीवाद अजित पवार गटाकडून केला गेला होता.

निवडणूक आयोगाकडे दिलेल्या पत्रात, अजित पवारांनी सर्वाधिक आमदार, खासदार आणि पदाधिकारी आपल्याकडे असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच आहे, असा दावा केला होता. या आमदार-खासदारांचं प्रतिज्ञापत्रही अजित पवारांनी निवडणूक आयोगाला दिलं होतं. तसंच आता आपणच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचंही आयोगाला कळवलं होतं, यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला त्यांची बाजू मांडण्याबाबतची नोटीस दिली होती. पण शरद पवार यांनी सादर केलेली कागदपत्र मागे पडली आहे.

2 जुलैला अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या 9 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर शरद पवार गटाने, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांच्यासह 9 आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली होती. राष्ट्रवादीकडून ही कारवाई झाल्यानंतर दोन्ही गट निवडणूक आयोगात गेले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसआधी शिवसेना पक्षाचा निर्णय देताना निवडणूक आयोगाने ट्रिपल टेस्टचा आधार घेतला होता. पक्षाची घटना कोणता पक्ष फॉलो करतो? पक्षातले नेते आणि कार्यकर्ते कुणाच्या बाजूने आहेत? तसंच लोकप्रतिनिधी कोणाच्या बाजूने आहेत? या तीन प्रश्नांवर ट्रिपल टेस्ट घेण्यात आली होती. यात निवडणूक आयोगाने कोणताच पक्ष घटना फॉलो करत नाही, तसंच नेते आणि कार्यकर्ते कुणाच्या बाजूने आहेत हे तपासण्याची यंत्रणा नसल्याचं सांगितलं. पहिले दोन्ही मापदंड फॉलो होत नसल्यामुळे अखेर लोकप्रतिनिधी कुणाच्या बाजूने आहेत हे पाहून निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष कुणाचा हा निर्णय दिला होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow