हर्षवर्धन पाटील उद्या बोरी गावात एक दिवस मुक्कामी ; हे आहे कारण
आय मिरर(देवा राखुंडे)
बोरी (ता. इंदापूर) गावामध्ये भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे गाव चलो अभियान शनिवारी (दि.10) दिवसभर राबविले जाणार आहे. या अभियानामध्ये हर्षवर्धन पाटील हे बोरी गावामध्ये शनिवारी रात्रीचा मुक्काम करणार आहेत. त्यानंतर रविवारी सकाळी हर्षवर्धन पाटील यांच्या ग्रामस्थांशी गाठीभेटीने एक दिवसीय अभियानाची समाप्ती होईल.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जगत प्रकाश नड्डा यांच्या निर्देशानुसार “गाव चलो अभियान” देश व राज्यभर सुरू करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 4 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत हे अभियान राज्यभर राबविले जात आहे
केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रसार व प्रचार या अभियानात केला जाणार आहे. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे 10 वर्षांतील प्रभावी कार्य, जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्तता, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी देशव्यापी ‘गाव चलो अभियान’ सुरु आहे. पंतप्रधान मोदीजींची गॅरंटी काय आहे, हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी सरकारच्या विविध योजना, कामगिरीची माहिती गावातील जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे, असे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
हर्षवर्धन पाटील यांचे बोरी गावामध्ये गाव चलो अभियानासाठी शनिवारी सकाळी 11.30 वा. श्रीराम मंदीर येथे आगमन होईल. त्यानंतर गावामध्ये ठिकठिकाणी चर्मकार समाज, मुस्लिम समाज, लोहार समाज, मारवाडी, कुंचीकोरवे समाज (केरसुनी व्यवसाय), वडार समाज आदी विविध समाजातील व्यवसायकांबरोबर चर्चा व त्यांच्या समस्या हर्षवर्धन पाटील ऐकून घेतील.
तसेच शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन द्राक्ष बाग शेती, पॉलिहाऊस यांची पाहणी करतील व त्यांच्या अडचणीत जाणून घेतील. तसेच समाजातील जेष्ठ नागरीकांची बैठक घेतील. त्यानंतर हर्षवर्धन पाटील सायंकाळी 7 वा. खंडोबा मंदिर येथे आरती करतील व तेथे ग्रामस्थांची बैठक होईल. त्यानंतर गावात घोंगडी विणकर व्यवसायिकांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा करतील. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचा मुक्काम वैभव देवडे यांचे घरी राहील.या अभियानाच्या दुसरे दिवशी रविवारी (दि.12) सकाळी हर्षवर्धन पाटील हे विविध कार्यकर्त्यांच्या घरी नाष्टा चहापान करतील. हर्षवर्धन पाटील यांच्या बोरी गावातील गाव चलो अभियानात इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
What's Your Reaction?