इंदापूरात शहा ग्लोबल स्कुलची सुरवात,श्रीमती मालती सुरेशदास शहा यांच्या शुभहस्ते उद्घाटन

Jun 14, 2024 - 19:02
 0  1163
इंदापूरात शहा ग्लोबल स्कुलची सुरवात,श्रीमती मालती सुरेशदास शहा यांच्या शुभहस्ते उद्घाटन

आय मिरर

इंदापूर येथील शहा ग्लोबल स्कुलमध्ये आमच्यावर विश्वास ठेवून पालकांनी आपल्या मुलांचा प्रवेश घेतला. या विश्वासाला शहा परिवार कोठेही तडा जावू देणार नाही हा विश्वास देतो. इंदापूर तालुक्यात ऐकेकाळी शिक्षणाची सुविधा नसताना, 1938 साली आमच्या आजोबांनी शाळा व कॉलेजची स्थापना केली. तोच वारसा जपत, आधुनिक शिक्षणाची गरज ओळखून त्यांचे पणतु अंगद शहा यांनी ग्लोबल स्कुलची सुरवात केली हा योगायोग आहे. असे मत इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा यांनी व्यक्त केले.

इंदापूर शहरातील आय कॉलेजच्या मागे माळवाडी रोड लगत शहा ग्लोबल स्कुलची सुरवात, श्रीमती मालती सुरेशदास शहा यांच्या हस्ते फित कापून गुरुवार ( दि. 13 जून ) रोजी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नागरिक संघांचे माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर, शहा ग्लोबल स्कुलचे विश्वस्त मुकुंद शहा, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. संजय शहा, स्कुलचे व्यवस्थापक अंगद शहा होते. तर रोटरीचे माजी अध्यक्ष संजय दोशी, वसंत मालुंजकर, नरेंद्र गांधी, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, वैशाली शहा, रुचिरा अंगद शहा, मे. लिलाचंद दलुचंद शहा परिवाराचे मुकुंद शहा, नितीन शहा व डॉ. राम अरणकर, अरविंद गारटकर, चितरंजन पाटील, राजेंद्र जगताप व शहरातील प्रतिष्ठित मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पुढे बोलताना भरत शहा म्हणाले की, या शाळेतील विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता व्यवहारीक ज्ञान देण्यावर आमचा भर असणार आहे. शाळेतील शिक्षण दर्जेदार असेलच, त्याचबरोबर येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा पाया मजबूत करणार आहोत. पालकांच्या चांगल्या सूचनांचे शाळा स्वागत करेल आणि येणारी पिढी सुसंस्कृत घडेल अशी ग्वाही देतो. असेही भरत शहा म्हणाले. 

यावेळी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्यादिवशी आनंद घेता यावा यासाठी सेल्फी पॉईंट, खेळणी व सर्व वर्ग खुले करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगद शहा यांनी केले तर सूत्रसंचालन समन्वयक ऋतुजा महाजन यांनी केले. पालक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत स्कुलच्या शिक्षिका रिटा शुक्ला, कल्याणी यादव, संध्या यादव, श्रुतिका खटावकर यांनी केले. तर यावेळी नंदकुमार गुजर, डॉ. संजय शहा, मुकुंद शहा यांनी मनोगत व्यक्त करीत पालक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. 

विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर जगाचे ज्ञान द्यावे 

मुलांना केवळ पुस्तकातील अभ्यासाचे ज्ञान नको, तर त्यांना सामान्य ज्ञान, समाजात कसे वागायचे याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. शिस्त आणि वेळेचे महत्व आयुष्यात खूप महत्वाचे आहे. अभ्यासाबरोबरच आयुष्य जगण्याची कला शिकवावी तरच विद्यार्थी आणि आपला देश पुढे जाईल. विद्यार्थांला एक आदर्श व्यक्ती म्हणून घडविण्यासाठी शहा परिवाराने सुरू केलेल्या या शहा ग्लोबल स्कुल मधून देशाचे भविष्य घडेल. असा मला विश्वास आहे. असे प्रतिपादन जेष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow