यासारखा नालायक माणूस नाही ! अजितदादांच्या सख्या भावाची जळजळीत टीका

Mar 19, 2024 - 12:07
 0  1428
यासारखा नालायक माणूस नाही ! अजितदादांच्या सख्या भावाची जळजळीत टीका

आय मिरर

पंचवीस वर्षे मंत्री केले, चार वेळा उपमुख्यमंत्री केले तरीसुद्धा काकांनी माझ्यासाठी काय केले असे म्हणायचे. पुढच्या काही वर्षांत दुसऱया व्यक्तीकडून लाभ मिळणार आहे म्हणून वय झालेल्या व्यक्तीची किंमत करत नाही.यासारखा नालायक माणूस नाही, अशी जळजळीत टीका श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर केली. श्रीनिवास पवार हे अजितदादांचे सख्खे बंधू आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडून अजित पवार भाजपबरोबर गेले. मात्र, संपूर्ण पवार कुटुंबाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे आज पुन्हा स्पष्ट झाले आहे. श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी आज बारामती तालुक्यातील आपल्या गावी काटेवाडीत बैठक घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी श्रीनिवास पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जळजळीत शब्दांत टीका केली.

श्रीनिवास पवार म्हणाले, तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की मी दादांच्या (अजित पवार) विरोधात कसा? मी नेहमी त्याला साथ दिली. चांगल्या-वाईट काळात दादांच्याबरोबर राहिलो. भाऊ म्हणेल तशी मी उडी मारली. दादाची माझी चर्चा झाली. त्यावेळी मी त्याला म्हटले की आमदारकीला तू आहेस, तर खासदारकी साहेबांना (शरद पवार) दिली पाहिजे. कारण साहेबांचे आपल्यावर उपकार आहेत हे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे.

श्रीनिवास पवार म्हणाले, ज्या साहेबांनी पंचवीस वर्षे मंत्री केले, चार वेळा उपमुख्यमंत्री केले तरीसुद्धा काकांनी माझ्यासाठी काय केले असे म्हणायचे. असा काका मला असता तर मी खुश झालो असतो. पवार साहेबांचे वय 83 झाले आहे. या वयात त्यांना सोडणे मला पटले नाही. मला काही व्यक्ती म्हणाल्या इथून पुढची वर्षे दादांचे आहेत साहेबांची नाही. हा विचार मला वेदना देऊन गेला. पुढच्या काही वर्षांत दुसऱया व्यक्तीकडून आपल्याला लाभ मिळणार आहे, म्हणून वय झालेले व्यक्तीची आपण किंमत करत नाही. यासारखा नालायक माणूस नाही, असे माझे वैयक्तिक मत आहे, अशा शब्दांत श्रीनिवास पवार यांनी अजितदादांवर संताप व्यक्त केला.

श्रीनिवास पवार यांनी भाजपवरही निशाणा साधला. ते म्हणाले, भाजपने शरद पवार यांना संपवण्याचा खूप प्रयत्न केला. घरातला कुणीतरी फोडल्याशिवाय ते घर संपत नाही. हा इतिहास आहे. घर एक असेल तर ते संपवू शकत नाही. घरातला माणूसच घरच्यांना घाबरत नाही. माझे हे बोलणे रेकार्ंडग करत असाल तर, मला देणे घेणे नाही. तुम्ही कोणाला पाठवायचे ते पाठवा. मी कोणालाही घाबरत नाही. मी कुणाकडेही लाभार्थी म्हणून जाणार नाही. साहेब जर दहा वर्षांपूर्वीचे असते, तर त्यांनी काय केले असते हे तुम्हाला ठाऊक आहे. वय वाढले म्हणून तुम्ही वयस्कर माणसाला कमजोर समजू नका.

आपल्याला साहेबांना विजयी करायचं – शर्मिला पवार

तुम्ही सर्वजण कुटुंबाचा भाग आहात. कोणाला विरोध करायचा नाही. कुटुंब म्हटलं की भांडय़ाला भांडं लागतं. पण आपल्या कुटुंबात कधी घडलं नाही, आता ते घडले आहे. आपल्या सगळ्यांच्या घरी वडिलधारी माणसं आहेत. आपली ओळख शरद पवार यांच्यामुळे आहे. पवार साहेबांचे विरोधकही त्यांचे नाव काढतात. त्यांनी आपल्यासाठी काय केलं? हा प्रश्न विचारणे म्हणजे, आई-वडिलांनी आपल्यासाठी काय केले असे म्हणण्यासारखे आहे. कोणाला यश मिळते हा मुद्दाच नाही. आपणाला शरद पवार यांनाच विजयी करायचं आहे, असे थेट मत शर्मिला पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow