काम संपवून क्रेन खालील साहित्य उचलायला वाकला तो परत उठलाचं नाही ; वाचा नेमकं काय घडलं पुण्यात
आय मिरर
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात क्रेनचा हूक डोक्यात पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. क्रेनचा लोखंडी हूक डोक्यात पडून तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची ही घटना नाना पेठेतील डोके तालीम चौकात घडली आहे.पांडुरंग अमृतराव म्हस्के (वय 35, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असं घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.या प्रकरणी क्रेनचालक, मालक आणि ठेकेदाराविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन एप्रिल रोजी सकाळी नाना पेठेत विजेचे खांब बसविण्याचं काम सुरू होतं. हे काम संपल्यानंतर पांडुरंग म्हस्के क्रेनच्या खाली साहित्य गोळा करत होते. त्यावेळी क्रेनचालकाने क्रेनचा लोखंडी हूक वरच्या बाजूला ओढल्यामुळे तो तुटला. हा तुटलेला हूक म्हस्केंच्या डोक्यात पडला.
हूक डोक्यात पडल्याने हा तरुण यात गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवण तुळशीदास नाथ (वय 28), फैय्याज इद्रीस अहमद उर्फ इम्तियाज, सीमा जांभळे, बाबू शिंदे, योगेश बबन म्हस्के यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोखंडी तार झिजल्याचं आधीच माहिती होतं...
मिळालेल्या माहितीनुसार, क्रेन चालक आणि मालकाला क्रेनच्या हुकला जोडलेली लोखंडी तार झिजल्याचं माहित होतं. यासोबतच म्हस्के खाली काम करत असल्याचं माहिती असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून क्रेनचा हुक जोरात वर खेचला. त्यामुळे हा हुक तुटून म्हस्के यांच्या डोक्यात पडला आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं तपासात उघड झालं आहे.
What's Your Reaction?