आंतरराष्ट्रीय वेस्ट एशिया बेसबॉल कप २०२५ स्पर्धेसाठी इंदापूर येथील खेळाडू अक्षय बाळासाहेब मोरे रवाना

May 17, 2025 - 17:01
May 17, 2025 - 17:45
 0  126
आंतरराष्ट्रीय वेस्ट एशिया बेसबॉल कप २०२५ स्पर्धेसाठी इंदापूर येथील खेळाडू अक्षय बाळासाहेब मोरे रवाना

आय मिरर, डॉ. संदेश शहा

वर्ल्ड बेसबॉल सॉफ्ट बॉल कॉन्फेडरेशन, बेस बॉल फेडरेशन ऑफ एशिया आणि इराण बेसबॉल फेडरेशनच्या वतीने दिनांक १५ ते २१ मे २०२५ दरम्यान इराण देशातील कराज येथे सुरू झालेल्या सोळाव्या आंतरराष्ट्रीय वेस्ट एशिया बेसबॉल कप २०२५ स्पर्धेसाठी भारतीय बेसबॉल संघात इंदापूर येथील कु.अक्षय बाळासाहेब मोरे याची निवड झाली असून तो या स्पर्धेसाठी इराण येथे रवाना झाला आहे. भारतीय बेसबॉल संघा मध्ये निवड झालेला तो इंदापूर तालुक्यातील पहिला व एकमेव खेळाडू आहे.

विशेष म्हणजे घरातील कोणतीही बेसबॉल खेळाची पार्श्वभूमी नसताना देखील त्याने या खेळाचे नैपुण्य प्राप्त केले असून तो देशाचा स्टार खेळाडू बनला आहे. इंदापूर तालुक्या च्या या उगवत्या खेळाडूंनी या स्पर्धेत इतिहास निर्माण केला असून त्याच्यामुळे इंदापूर तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले आहे.

या स्पर्धेत भारत, इराण, पाकिस्तान, श्रीलंका, बांगला देश, पॅलेस्टाईन तसेच अफगाणिस्तान हे ७ देश सहभागी झाले आहेत. 

अक्षय हा इंदापूर तालुक्यातील माळवाडी नंबर दोन येथील मोरे कृषी उद्योग समूह या शेतकरी कुटुंबातील असून त्याला विक्रम गलांडे, विष्णू काळेल, राकेशकुमार यांचे मार्गदर्शन लाभले. अक्षय हा इंदापूर अर्बन सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांचे चिरंजीव असून त्याने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली आहे.

ॲमॅच्यूयर बेस बॉल फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र बेस बॉल असोसिएशन तसेच अक्षय मोरे मित्र परिवाराच्या वतीने अक्षय चे अभिनंदन करून त्याला स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow