बाप रे…तब्बल 9 कोटी 3 लाख रुपयांचा अपहार केला, वाचा त्या बँकेत काय घडलं

Dec 10, 2024 - 07:33
 0  663
बाप रे…तब्बल 9 कोटी 3 लाख रुपयांचा अपहार केला, वाचा त्या बँकेत काय घडलं

आय मिरर

बारामतीतील पंढरपूर अर्बन बँकेच्या शाखाधिकार्‍याकडून 9 कोटी 3 लाख रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.अमित प्रदीप देशपांडे असे या गुन्हा दाखल झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. देशपांडे हा पंढरपूर अर्बन बँकेच्या बारामतीतील शाखेत व्यवस्थापक म्हणून काम करत होता. 

बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 834/2024 BNS कलम 316(5),318(4),338,336(3),340(2) करण्यात आला आहे. या प्रकारात फसवणुक केलेली एकुण रक्कम - एकूण 9,03,9,361.30 नऊ कोठी, तीन लाख, नऊ हजार, तीनसे एकस्पष्ट रूपये तीस पैसे अशी रक्कम आहे. दिनांक 28/09/2023 ते दिनांक 12/11/2024 रोजी दरम्यान हा प्रकार घडला आहे.

बारामतीतील पंढरपूर अर्बन बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ताळेबंद पत्रकाची पडताळणी केल्यानंतर बँकेच्या व्यवस्थापकाने पदाचा गैरवापर करून महिला क्लार्कच्या कोडचा वापर करत बनावट कागदपत्रे जमा केल्याचे उघडकीस आले.

ही कागदपत्रे खरी असल्याचे भासवून बारामतीतील शाखेच्या सस्पेन्स रिसिव्हेबल खात्यातून अधिकार नसताना 2 कोटी 30 लाख रुपये परस्पर उचलून धन्वंतरी नागरी पतसंस्थेमध्ये ठेवले. धन्वंतरी नागरी पतसंस्थेमध्ये बनावट उघडलेली 5 खाती, त्यामध्ये तीन कोटी 23 लाख 72 हजार रुपये जमा केले. बँक ऑफ बडोदामध्ये भरणा करावयाची रक्कम म्हणून 31 लाख रुपये काढले. त्याचीही परस्पर विल्हेवाट लावण्यात आली.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांना हा सारा प्रकार गैरव्यवहार असल्याचे दिसून आल्याने त्यांनी बँकेच्या मुख्य शाखेतील व्यवस्थापक कृष्णकुमार पुरुषोत्तम पेंडाल यांना अधिक तपास करण्याची सूचना केली आणि त्यानंतर पेंडाल यांनी फिर्याद दिली व पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

देशपांडे यांनी बँकेत ठेवलेल्या ग्राहकांच्या सोनेतारण कर्ज खात्याच्या 83 खातेदारांचे बँकेत ठेवलेले खरे दागिने काढून तेथे बनावट दागिने ठेवण्याचा देखील प्रकार घडला आहे.

खरे दागिने बाहेरील फायनान्स कंपन्यांना देऊन त्यावर कर्ज काढले आणि 10 ग्राहकांच्या नावाने बनावट खाते काढली. त्याच्या बनावट सह्या करून त्या खात्यावर कर्ज वितरित केल्याचे दाखवले व बँकेत बनावट सोने ठेवले. त्याच्या माध्यमातून तब्बल 37 लाख 56 हजार रुपयांचा अपहार केला असे देखील फिर्यादीत नमूद केले आहे. 

बँकेतील सोनेतारण कर्ज खात्याच्या प्रकरणांमध्ये 3 कोटी 18 लाख 37 हजार रुपयांचा अपहार झाला असे देखील फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. अशाप्रकारे बँकेची 9 कोटी 3 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास बारामती पोलीस करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow