'आई कधीही लेकराच्या ताटातील खात नसते,पैसे नको केवळ साथ हवी' पंकजा मुंडेंचे भावनिक आवाहन
आय मिरर
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ साखर कारखाना अडचणीचा सामना करत असताना पंकजा मुंडे यांच्या मदतीला थेट हजारो मुंडे समर्थक सरसावले आहेत. हजारांपासून ते थेट लाखोंचे धनादेश त्यांना पंकजा मुंडे यांना देऊ केले असून आमचे दैवत स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांनी आमच्यासाठी अवघे आयुष्य वेचले आहे त्यांचा विचार घेऊन आपण पुढे चालत आहात म्हणून आमचं कर्तव्य निभावण्यासाठी आम्ही ही मदत देत आहोत असं मुंडे समर्थकांनी म्हटले आहे.
मात्र असं असलं तरी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ही मदत नाकारली असून आई कधीही लेकराच्या ताटातील खात नसते, मला पैसे नको, केवळ तुमची साथ मला हवी आहे असं भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे. वैद्यनाथ संकटातून बाहेर काढण्यासाठी योग्य दिशेने पावल टाकणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
तुम्ही सारेजण माझ्यासाठी मोठमोठ्या रकमेचे चेक जाहीर करताय, परंतु मी देणाऱ्याच्या भूमिकेत आहे, तुमचे चेक, तुमची रक्कम घेणे माझ्या स्वाभिमानी बाण्याला प्रशस्त वाटत नाही. हा स्वाभिमान तुम्हीच मला दिलाय. आई कधी लेकराच्या ताटातील खात नसते त्यामुळे तुमची ही रक्कम मी घेऊ शकत नाही, केवळ तुमचे प्रेमच मला हवे आहे अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी समर्थकांना आवाहन केले आहे.
वैद्यनाथ कारखान्याला झालेल्या दंडानंतर समर्थकांनी हा दंड भरण्यासाठी मोठमोठ्या रकमेचे चेक सोशल मिडीयातून व्हायरल केले होते. यावर पंकजा मुंडे यांनी एका व्हीडीओच्या माध्यमातून समर्थकांना आवाहन केले आहे. कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी वकील, सीए यांचे सल्ले घेत आहे. मला संकटे काही नवीन नाहीत. परंतु या प्रत्येक संकटात तुम्ही माझ्यासोबत राहीला आहात. त्यामुळे आपले नाते अधिक घट्ट होत आहे.
श्रीकृष्णाला गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी त्यांच्या सवंगड्यांनी मदत केली. तुमची देखील तशीच इच्छा आहे. परंतु तुमची मला केवळ साथ हवी आहे. तुमच्याकडून पैसे घेणे मला प्रशस्त वाटत नाही. लवकरच आपण सर्वजण या संकटातून बाहेर पडू असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
What's Your Reaction?