'बाहेर ये तुला दाखवतो,' सभागृहातच अनिल परब आणि शंभूराज देसाई भिडले, वाचा सविस्तर

Jul 10, 2025 - 18:46
Jul 10, 2025 - 18:49
 0  390
'बाहेर ये तुला दाखवतो,' सभागृहातच अनिल परब आणि शंभूराज देसाई भिडले, वाचा सविस्तर

आय मिरर 

मराठी माणसाला मुंबईत हक्काचं घर देण्याच्या मुद्द्यावरुन सभागृहात अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. अनिल परब यांनी मराठी माणसाला प्राधान्याने घर देण्यासाठी 40 टक्क्यांची अट टाकून कायदा आणणार का?

असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी 2019-2022 दरम्यान सरकार असताना तुम्ही का केलं नाही? अशी विचारणा केली. यानंतर त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. यानंतर शंभूराज देसाईंनी 'कोणाला गद्दार म्हणतो. बाहेर ये तुला दाखवतो' अशा शब्दांत अनिल परब यांना इशारा दिला.

शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी मराठी माणसांच्या घराचा मुद्दा मांडत सांगितलं की, "निशिकांत दुबेंचा खारमध्ये फ्लॅट आहे. येथे राहत नाही आणि भाड्याने दिला आहे. मराठी माणसाला घर नाही आणि बाहेरील लोक येथे येऊन गुंतवणूक करतात. खासगी जमीन नाही, मात्र जिथे पुनर्विकास सुरु आहे, जिथे शासनाला फायदा मिळत आहे तिथे शासन आरक्षणाची अट टाकू शकतं". "माझगावमध्ये एक काळ मराठी माणसाचा होता. पण आता सर्व विकासक आधी जैन मंदिर बांधतात. कोणाची आत जाण्याची हिंमतच होत नाही. यामुळे सामाजिक तेढ निर्माण होतं," असंही ते म्हणाले.

"आपल्या प्राधिकरणाच्या माध्यमातून, किंवा अनुदानित योजना आहेत त्या आरक्षणाची माहिती दिली आहे. मराठी माणसाचाच अधिकार आहे. खुल्या गटातील 50 टक्क्यात मराठी भाषिकांना प्राधान्य आहे," असं उत्तर यावर शंभूराज देसाईंनी दिलं.

त्यानंतर अनिल परब बोलण्यासाठी उभे राहिले. "मराठी माणसाला प्राधान्य मिळालं हा कायदा नाही. सरकारची, मराठी माणसाची इच्छा आहे तर मग कायदा करा? नवीन पुनर्विकास जिथे सुरु आहे, तिथे 40 टक्के घऱं मराठी माणसाला परवडतील. आपली इच्छा आहे का? काय करु इच्छितो हे सगळं सभागृहापरतं राहतं. आमची इतकीच अपेक्षा आहे की, त्यांनी सकारात्मक कायदा आणतो असं म्हणावं. समिती आणावी", अशी मागणी त्यांनी केली.

"कायदा आणल्याशिवाय मराठी माणसाला न्याय मिळणार नाही. समिती करा. यासंदर्भात कायदा आणतो असं जरी सांगितलं तरी मराठी माणसाला दिलासा मिळेल. कारण मराठी माणसाचं लक्ष्य या अधिवेशनाकडे लागलेलं असतं. आमच्यासंदर्भातील काय प्रश्न विचारले जातात हे ते पाहत असता. मराठी माणसाला प्राधान्याने घर देण्यासाठी 40 टक्क्याची अट टाकून कायदा आणणार का?," असा प्रश्न त्यांनी विचारला.

शंभूराज देसाईंनी यावर उत्तर देताना सांगितलं की, "मराठी माणसाच्या रक्षणासाठी या सरकारची भूमिका आहे. अनिल परब ज्या पद्धतीने पुनर्विकास प्रकल्प, म्हाडा, एसआरएस प्रकल्प असतील त्यासंदर्भातील तिडकीने मराठी माणसासाठी भूमिका मांडत आहेत तीच या सदनाची, महायुतीच्या सरकारची आहे. 2019-22 च्या सरकारमध्ये असं धोरण, नियम, कायदा केलं होतं का? त्यावेळी हा कायदा झाला नव्हता".

त्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालत शंभूराज देसाईंना जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यावर शंभूराज देसाई त्यांना उपहासात्मकपणे म्हणाले, तुम्ही केलं नाही हे रेकॉर्डवर येतं हे ऐकवत नाही का? तुम्ही करु शकला नाही. तुमचं पुतणा मावशीचं प्रेम आहे. यांना इतकं झोंबवण्याचं कारण काय आहे? आपण केलं नाही हे स्विकारा. मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आणि वरवरचं आहे हे दिसू द्या".

शंभूराज देसाईंनी यानंतर आता मला वेळ द्या असं सांगत बोलण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान अनिल परब आणि इतर आमदार गदारोळ घालत होते. त्यावेळी अनिल परब यांनी त्यांना गद्दार म्हटल्याने संतापले. "मी काय करत होतो सांगू का? कोणाला गद्दार म्हणतो. बाहेर ये तुला दाखवतो", अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow