तिचं वय कमी होतं तरीही विवाह सोहळा थाटला होता ! माळेगाव पोलिसांना कुणकुण लागली अन् करेक्ट कार्यक्रम झाला

आय मिरर
बारामतीत माळेगाव खुर्द येथे होणारा एका तेरा वर्षीय मुलीचा बालविवाह माळेगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोखला गेलाय.याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी नवरी मुलीचे आई-वडिल आणि नवरदेवाचे आई-वडील आणि नवरदेव मुलगा मिळून एकूण पाच जणांविरोधात बाल विवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी माळेगाव खुर्द येथील नवरी मुलीचे वडील राजेश अजगर भोसले आई वारणा राजेश भोसले तर नवरदेव राहुल भानुदास शिंदे, नवरदेवाचे वडील भानुदास मायाजी शिंदे व नवरदेवाची आई रुपाली भानुदास शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून हे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील पिंपरी गावचे आहेत.
बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द या गावी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या असलेल्या यशवंत सभागृहात ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वकल्पना न देता दि. 20 एप्रिल रोजी सायंकाळी चार ते पाच वाजताच्या सुमारास या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते.
मात्र याची कुणकुण माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांना लागली. लोखंडे यांनी तातडीने पावले उचलले थेट माळेगाव बुद्रुक गाठले. त्या ठिकाणी नवरदेव आणि नवरी मुलीच्या वयाची चौकशी केली असता नवरी मुलीचे वय तेरा वर्षे आठ महिने असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी थेट कारवाई करत ही लग्नाची वरात थेट पोलीस ठाण्यात आणली आणि या प्रकरणी नवरी मुलीचे आई-वडील नवरदेवाचे आई वडील या सह नवरदेव मुलगा अशा एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माळेगाव खुर्द गावचे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक इम्तियाज इनामदार यांनी पोलिसात तक्रार दिली असून भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 3 (5) सह बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006 चे कलम 9, 10 प्रमाणे नवरी मुलीचे आई वडील, नवरदेव, नवरदेवाचे वडील व नवरदेवाची आई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार सय्यद करत आहेत.
What's Your Reaction?






