उजनीत वरील धरणातून तात्काळ 10 टीएमसी पाणी सोडा ! भिगवणमध्ये पुणे सोलापूर मार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको
आय मिरर(देवा राखुंडे)
उजनी धरणातून गरज नसताना सोडण्यात येत असलेले पाणी तात्काळ बंद करणे व उजनीच्या वरच्या धरणातून उजनीत प्रत्येकी दोन वेळा 10 टी एम सी पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी इंदापूरसह करमाळा, दौंड, कर्जत तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी एक फेब्रुवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास भिगवण येथे रास्ता रोको आंदोलन केले. यात मोठ्या संख्येने धरणग्रस्त शेतकरी सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या रास्ता रोको आंदोलनात करमाळा धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव बंडगर,इंदापूर तालुका धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष महारुद्र पाटील,अंकुश पाडुळे,धनंजय डोंगरे,अमोल भिसे,अरविंद जगताप,पराग जाधव,शामराव वाघ,दादासाहेब थोरात,बाळासाहेब मोरे,शरद काळे, विजयकुमार गायकवाड यांसह अनेकांनी सहभाग नोंदवला. उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन नायब तहसिलदार अनिल ठोंबरे यांना देण्यात आले आहे.
या वर्षी पाऊस कमी पडल्याने उजनी धरण केवळ 60.66 टक्के इतकेच भरलेले होते. परंतु अशी स्थिती असताना देखील 3 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत गरज नसताना कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले केवळ 10 दिवसांच्या अंतराने दुसरे आवर्तन 11 जानेवारी पासून सोडण्यात आलेले आहे. सोलापूर शहरासाठी पाणी पिणेकरीता नदीतून पाणी सोडल्याने आज उजनी धरण मायनस (वजा) 6.05 टक्क्याच्या खाली गेले आहे. त्यामुळे उजनी धरणासाठी त्याग केलेल्या इंदापूर, करमाळ, दौंड, कर्जत आदी तालुक्यातील मुळ धरणग्रस्तांवर अन्याय होत आहे.अशी भुमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
वास्तविक या धरण ग्रस्तांनी धरण निर्मितीसाठी प्रचंड त्याग करताना आपली घरे, जमिनी, गावे व आपल्या श्रद्धा पाण्याखाली गाडलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा येता कामा नये.त्यामुळे अनावश्यक रित्या चालु असलेले आवर्तन तात्काळ बंद करण्यात यावे. उजनी धरण ग्रस्तांसाठी दिलासा दायक स्थिती निर्माण होणेसाठी उजनी धरणाच्या वरील 19 धरणातील एकूण 20 टी एम सी पाणी प्रत्येकी 10 या प्रमाणे तात्काळ सोडण्यात यावे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांनी ठोक जलशुल्क निर्धारण आदेश दि. २९/०३/२०२२ रोजींचा आदेश हा शेतक-यांवर अन्याय कारक असलेने तो रद्द करण्यात यावा.सोलापूर शहराला पाणी सोडण्यासाठी समांतर जलवाहिनीचे काम तात्काळ पूर्ण करावे.कालवा सल्लागार समितीमध्ये इंदापूर तालुक्यातील दोन, करमाळा तालुक्यातील दोन व कर्जत तालुक्यातील एका उजनी धरण ग्रस्त प्रतिनिधिची निवड करण्यात यावी. तसेच कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना कार्यान्वित करण्यात यावि अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
What's Your Reaction?